Contact Banner

लालबागच्या दर्शन रांगेत जळगावच्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू दर्शनासाठी मुंबईला गेला होता; आज जळगावात अंत्यसंस्कार

 


लालबागच्या दर्शन रांगेत जळगावच्या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

दर्शनासाठी मुंबईला गेला होता; आज जळगावात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी | जळगाव



मुंबई येथील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असताना अचानक प्रकृती बिघडल्याने जळगाव येथील जयदीप मेघराज नेमाडे (वय २५) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी रात्री ११.४० वाजता ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे.



जयदीप हा जळगाव येथील नेमाडे ट्रान्सपोर्टचे संचालक मेघराज सुभाष नेमाडे (रा. जीवनमोती सोसायटी, शिरसोली रोड, जळगाव) यांचा एकुलता एक मुलगा होता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमबीएचे शिक्षण घेतले होते. सध्या तो पुणे येथे नोकरीला होता.

दरवर्षीप्रमाणे जयदीप मित्रांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईला गेला होता. गुरुवारी रात्री दर्शनाच्या रांगेत उभा असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले तसेच गुदमरण्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याने मित्रांना याबाबत सांगून रांगेतून बाहेर पडला.



प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच तेथील पोलिसांनी तातडीने मदत करत त्याला मदत कक्षात नेले. त्यानंतर रुग्णवाहिकेने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह जळगाव येथे आणण्यात आला.

जयदीपच्या आईचे सुमारे १२ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यातच आता एकुलत्या एक मुलाच्या निधनाने नेमाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता जयदीप यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार असून नेरी नाका स्मशानभूमी, जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.