Contact Banner

मंडळाच्या हिशोबाचा वाद ठरला जीवघेणा; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


 मंडळाच्या हिशोबाचा वाद ठरला जीवघेणा; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

लेवाजगत न्युज जामनेर | जळगाव जिल्हा प्रतिनिधी (नितीन इंगळे):-

जामनेर शहरातील इंदिरा आवास परिसरात मंडळाच्या मागील वर्षाच्या आर्थिक हिशोबावरून झालेल्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याच्या घटनेला दुर्दैवी वळण मिळाले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किशोर सुरेश बाविस्कर याचा जळगाव येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जामनेर शहरात खळबळ उडाली असून, बाविस्कर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर बाविस्कर याचा मंडळाच्या मागील वर्षाच्या आर्थिक हिशोबावरून काही जणांसोबत वाद सुरू होता. २ सप्टेंबर रोजी दुर्गादेवीच्या मूर्तीच्या बुकिंगसंदर्भात मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर जुन्या आर्थिक हिशोबाच्या कारणावरून पुन्हा वाद झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

वाद वाढल्यानंतर किशोर बाविस्कर याच्यावर चाकूने पोटावर वार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जामनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले.

मात्र, जळगाव येथे उपचार सुरू असतानाच किशोर बाविस्कर याचा मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हल्ल्यावेळी किशोरला वाचविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींनाही दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी किशोरच्या आईने जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीच्या आधारे निलेश प्रभाकर नानोटे आणि योगेश प्रभाकर नानोटे यांच्याविरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपासाला अधिक वेग दिला असून, घटनेमागील नेमका वाद, हल्ल्याची परिस्थिती आणि संबंधितांची भूमिका याबाबत तपास सुरू आहे.

जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी स्वप्नील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.