मावशीच्या घरावरच भाच्याचा डल्ला; रावेरातील घरफोडीचा छडा अवघ्या २४ तासांत दोघे जेरबंद; ३ तोळे सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड हस्तगत
मावशीच्या घरावरच भाच्याचा डल्ला; रावेरातील घरफोडीचा छडा
अवघ्या २४ तासांत दोघे जेरबंद; ३ तोळे सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड हस्तगत
![]() |
| लेवाजगत न्यूज मार्फत जाहिरात |
लेवाजगत न्यूज रावेर : रावेर शहरातील जुन्या नगरपालिका रोड परिसरात दिवसाढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या दोघांना रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले ३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यातील रितेश नेवे हा फिर्यादी महिलेच्या बहिणीचा मुलगा असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रितेश रवींद्र नेवे (वय ३९, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, कलेक्टर बंगल्याच्या मागे, जळगाव) आणि गजेंद्र सोपान चौधरी (वय ३८, रा. ममुराबाद, इंदिरानगर, ईदगाह रोड, जळगाव; हल्ली मुक्काम सिलवासा, जि. नगर हवेली) अशी आहेत.
रावेर शहरातील मधुसुदन मेडिकलसमोर, जुना नगरपालिका रोड येथे राहणाऱ्या कल्पना सुभाष वाणी (वय ६२, अंगणवाडी सेविका) या ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून कामानिमित्त अहीरवाडी येथे गेल्या होत्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेला व घरातील सामान अस्ताव्यस्त आढळून आले.
घराची पाहणी केली असता ५० हजार रुपये रोख, २ तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट तसेच प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी २० सप्टेंबर रोजी रावेर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपींचे चेहरे स्पष्टपणे कैद झाले होते. त्यावरून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.
त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी रितेश नेवे आणि गजेंद्र चौधरी यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान रितेश नेवे हा फिर्यादी कल्पना वाणी यांच्या बहिणीचा मुलगा असल्याचे समोर आले. फिर्यादी व त्यांच्या बहिणीचा मागील काही वर्षांपासून संपर्क नसल्याची माहितीही तपासात पुढे आली.
वाणी या घरात एकट्याच राहत असल्याची माहिती असल्याने आरोपींनी त्याचा फायदा घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. रितेश नेवे याने मित्र गजेंद्र चौधरीच्या मदतीने घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली. चौकशीदरम्यान पोलिसांनी ३ तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख असा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत