Contact Banner

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ९३ गावांसह यावल शहरातील १२ प्रभागांत दोन महिन्यांत ११,४४८ रुग्णांची तपासणी; १,०३९ नेत्रशस्त्रक्रिया यशस्वी

 

motibindumukt-yawal-taluka-11448-patients-examined-1039-eye-surgeries-successful

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

९३ गावांसह यावल शहरातील १२ प्रभागांत दोन महिन्यांत ११,४४८ रुग्णांची तपासणी; १,०३९ नेत्रशस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे राबविण्यात आलेल्या ‘मोतीबिंदूमुक्त यावल तालुका’ या विशेष अभियानाला यावल तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १० जून ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अभियानांतर्गत तब्बल ११ हजार ४४८ रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करण्यात आली असून १ हजार ३९ रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या.

ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत यावल तालुक्यातील ९३ गावांमध्ये तसेच यावल शहरातील १२ प्रभागांमध्ये नेत्रतपासणी शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी दूर जाण्याची आवश्यकता भासली नाही. वेळेत निदान आणि उपचाराची सुविधा त्यांच्या जवळच उपलब्ध झाली.

११ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी

अभियानाच्या सुरुवातीपासून ७ सप्टेंबरपर्यंत एकूण ११,४४८ रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोतीबिंदूसह विविध नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यापैकी २,९२२ रुग्णांना आंतररुग्ण विभागात दाखल करून उपचार देण्यात आले.

मोतीबिंदूमुळे दृष्टी कमी झालेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात आली. आतापर्यंत १,०३९ नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. शस्त्रक्रियेनंतर अनेक रुग्णांना स्पष्ट दृष्टी मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल झाला.

गावोगावी पोहोचली नेत्रसेवा

ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच उपचारापासून वंचित राहणाऱ्या गरजू नागरिकांपर्यंत नेत्रसेवा पोहोचविणे हे या अभियानाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. गावोगावी आयोजित शिबिरांमध्ये केवळ मोतीबिंदूची तपासणी न करता विविध नेत्रविकारांची तपासणी, प्राथमिक उपचार, आवश्यक मार्गदर्शन तसेच पुढील उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला देण्यात आला.

अनेक रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे वेळेत निदान झाल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य झाले. त्यामुळे मोतीबिंदूमुळे होणारे टाळता येण्याजोगे अंधत्व रोखण्याच्या दृष्टीने हे अभियान उपयुक्त ठरले.

तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत

या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत होती. डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे यांनी रुग्णसेवेत योगदान दिल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

अभियानाची ठळक कामगिरी

  • अभियान कालावधी : १० जून ते ७ सप्टेंबर २०२६
  • गावे : ९३
  • यावल शहर : १२ प्रभाग
  • एकूण बाह्यरुग्ण तपासणी : ११,४४८
  • आंतररुग्ण विभागात दाखल : २,९२२
  • एकूण नेत्रशस्त्रक्रिया : १,०३९

आता चोपडा तालुक्यात अभियान

यावल तालुक्यातील अभियानाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता ‘मोतीबिंदूमुक्त’ अभियानाची पुढील मोहीम चोपडा तालुक्यात राबविण्यात येणार आहे. ग्रामीण व गरजू नागरिकांना त्यांच्या परिसरातच नेत्रतपासणी आणि उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या अभियानाचा विस्तार करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.