Contact Banner

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा २७ सप्टेंबरला; ‘गोदावरी करंडक’साठी रंगणार स्वरांची मैफल

 

jalgaon-godavari-karandak-state-level-bhavgeet-competition-27-september-2026

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम

राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा २७ सप्टेंबरला; ‘गोदावरी करंडक’साठी रंगणार स्वरांची मैफल

लेवाजगत न्यूज जळगाव : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगावतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धे’ची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. या स्पर्धेचे आयोजन रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले असून, यंदा स्पर्धेचे २९ वे वर्ष आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या स्पर्धेच्या माध्यमातून विविध वयोगटांतील हौशी गायक-गायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या स्पर्धेतून अनेक गायक-कलाकारांना आपली गायनकला सादर करण्याची संधी मिळाली आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, राज्यभरातून स्पर्धक सहभागी होणार आहेत.

तीन वयोगटांत स्पर्धा

स्पर्धा बाल गट, किशोर गट आणि प्रौढ गट अशा तीन वयोगटांत घेण्यात येणार आहे. बाल गटात इयत्ता पहिली ते सहावी, किशोर गटात इयत्ता सातवी ते बारावी, तर प्रौढ गटात ४० वर्षांपर्यंतचे स्पर्धक सहभागी होऊ शकतील.

प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, गोदावरी करंडक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रौढ गटातील प्रथम क्रमांकासाठी २ हजार १ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १ हजार ५०१ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार १ रुपयांचे पारितोषिक आहे. किशोर गटात प्रथम १ हजार ५०१, द्वितीय १ हजार १ आणि तृतीय ७०१ रुपये, तर बाल गटात प्रथम १ हजार १, द्वितीय ७०१ आणि तृतीय क्रमांकासाठी ५०१ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिके व प्रमाणपत्रेही देण्यात येणार आहेत.

सकाळी आठ वाजता स्पर्धेला प्रारंभ

स्पर्धेला २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. किशोर व प्रौढ गटासाठी मराठी चित्रपटांतील भावगीते व गझल सादर करता येतील. बाल गटासाठी बालगीते व भावगीते ग्राह्य धरली जातील.

ही स्पर्धा केवळ हौशी कलाकारांसाठी असून व्यावसायिक तसेच आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकारांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच गीत सादर करता येईल. तसेच गीताचे जास्तीत जास्त दोनच अंतरे सादर करण्याची परवानगी असेल, अशी माहिती आयोजकांनी दिली.

इच्छुक स्पर्धकांनी प्रवेश अर्जाची छायांकित प्रत सादर करून सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय, गोदावरी रुग्णालय, भास्कर मार्केटजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा.

संपर्क : ९८५०० ७५६५१, ९९२१९९ ६९७४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.