Contact Banner

संगीतकलेला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व -डॉ.रवींद्र भोळे

 

music-art-has-unique-importance-in-human-life-dr-ravindra-bhole

संगीतकलेला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व -डॉ.रवींद्र भोळे



music-art-has-unique-importance-in-human-life-dr-ravindra-bhole


लेवाजगत न्यूज उरुळी कांचन, तुपे वस्ती : संगीत कलेला अति प्राचीन इतिहास असून सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुगापासून ते कलियुगापर्यंत तत्त्ववेत्त्यांनी संगीताचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सामवेदामध्येही संगीताचा सखोल अभ्यास आढळतो. संगीतामुळे ताण-तणाव कमी होण्यास, स्मरणशक्ती व सकारात्मक प्रवृत्ती वाढण्यास मदत होते. गायनामुळे श्वासोच्छवास सुरळीत होऊन मानसिक व शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्य तसेच सामाजिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी संगीत हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी केले.

सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्थेच्या वतीने संचालित श्री साने संगीत विद्यालयात सौ. रेखा शिवराज साने व गायक शिवराज ज्ञानोबा साने यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या गुणगौरव व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवींद्र भोळे बोलत होते.

डॉ. भोळे पुढे म्हणाले की, अन्न, अक्षर, आरोग्य आणि आचरण ही मानवी जीवनातील महत्त्वाची अंगे आहेत. त्याचप्रमाणे संगीत हीदेखील मानवी मनाची एक महत्त्वाची भूक आहे. ही संगीताची भूक भागविण्यासाठी साने सरांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ कवी, लेखक व साहित्यिक विनोद मारुती अष्टूळ, सामाजिक कार्यकर्ते सागर बाळासाहेब कांचन, महानुभाव पंथाचे महंत गोपाल व्यास कपाटे, पत्रकार सौ. सुवर्णाताई कांचन, पत्रकार अमोल भोसले, पत्रकार बापूसाहेब चौधरी, पत्रकार सहदेव खंडागळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बालवाडीच्या संचालक सौ. शिल्पा सतीश लेले होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या अंतर्गत साने संगीत क्लासेसच्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षांतील व शैक्षणिक कामगिरीबद्दल गुणगौरव व पारितोषिके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक रोहिदास बिचकुले सर यांनी केले. आभार प्रदर्शन पत्रकार अमोल भोसले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.