Contact Banner

केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते फैजपूर–सावदा १४.२३० कि.मी. मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

 

रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांच्या हस्ते फैजपूर–सावदा रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

लेवाजगत न्यूज फैजपूर : बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत फैजपूर शहर ते सावदा शहर या मार्गावरील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत फैजपूरच्या नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फैजपूर शहर ते सावदा शहर दरम्यान कि.मी. १८९.२४० ते २०४.५०० या अंतरातील एकूण १४.२३० कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी २७ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भूमिपूजनानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, त्यामुळे फैजपूर–सावदा मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.

बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गामुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना बायपास मार्ग उपलब्ध होणार आहेत. परिणामी शहरांतर्गत विद्यमान प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक, व्यावसायिक व्यवहार आणि नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणावर परिणाम होऊ नये, यासाठी या समांतर रस्त्याच्या विकासाची आवश्यकता होती.

याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यातून फैजपूर–सावदा मार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. मजबूत काँक्रीट रस्त्यामुळे वाहनधारकांना वर्षभर सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

या रस्त्याच्या विकासामुळे फैजपूर व सावदा शहरांमधील दळणवळण अधिक गतिमान होणार असून, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार तसेच परिसरातील नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. सुधारित रस्त्यामुळे स्थानिक बाजारपेठा, व्यापार आणि परिसरातील आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.







प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर शहरांतील समांतर रस्त्यांचा विकास होत असल्याने संपूर्ण परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांच्या हस्ते झालेल्या या भूमिपूजनामुळे फैजपूर–सावदा रस्त्याच्या विकासाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून, नागरिकांनी या कामाचे स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.