रावेर तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कूल सावदा विजयी
रावेर तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कूल सावदा विजयी
लेवाजगत न्यूज सावदा : रावेर तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथे करण्यात आले. या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या फुटबॉल सामन्यात डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा आणि डायमंड स्कूल, सावदा यांच्यात चुरशीची लढत रंगली.
सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत एकमेकांना कडवी झुंज दिली. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत राहिल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा संघाने ४-२ अशा फरकाने विजय मिळवला. या शानदार कामगिरीमुळे डॉ. उल्हास पाटील स्कूलचा संघ १७ वर्षे वयोगटात तालुकास्तरीय विजेता ठरला.
दरम्यान, १४ वर्षे वयोगटातील स्पर्धेसाठी रावेर तालुक्यातील अन्य कोणताही संघ सहभागी झाला नाही. त्यामुळे या वयोगटात डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा संघ विजेता ठरला.
सामन्यासाठी पंच म्हणून क्रीडा शिक्षक असलम अली यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या आयोजनासाठी क्रीडा शिक्षक वसीम शहा, प्रशांत सोनवणे, तुषार सैतवाल, तसेच शिक्षिका रीमशा मल्लिक, मंतशा खान, अर्शिया फातिमा आणि नौशाद शेख यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका तनुजा चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन होत्या. तालुका क्रीडा समन्वयक युवराज माळी यांचे स्पर्धेला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय विजयाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, क्रीडा शिक्षक तसेच सर्व शिक्षकवर्गाने विजयी संघाचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत