रावेर-यावल कृषी कार्यालयातील ५६ रिक्त पदे तातडीने भरा आमदार अमोल जावळे यांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी; पीक विम्याच्या प्रश्नांवरही चर्चा
रावेर-यावल कृषी कार्यालयातील ५६ रिक्त पदे तातडीने भरा
आमदार अमोल जावळे यांची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी; पीक विम्याच्या प्रश्नांवरही चर्चा
प्रतिनिधी लेवाजगत न्यूज रावेर-
रावेर व यावल तालुका कृषी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, शासकीय सेवा आणि तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेताना अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी दोन्ही तालुक्यांतील कृषी विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत चर्चा करण्यात आली.
रावेर तालुका कृषी कार्यालयात मंजूर ६७ पदांपैकी ४० पदे कार्यरत असून २७ पदे रिक्त आहेत. तर यावल तालुका कृषी कार्यालयात मंजूर ६७ पदांपैकी ३८ पदे कार्यरत असून २९ पदे रिक्त आहेत. अशा प्रकारे रावेर व यावल या दोन्ही तालुक्यांमध्ये एकूण ५६ पदे रिक्त आहेत.
यामध्ये कृषी सहाय्यकांची रिक्त पदे लक्षणीय आहेत. यावल तालुक्यात कृषी सहाय्यकांची १५, तर रावेर तालुक्यातही १५, अशी एकूण ३० पदे रिक्त आहेत.
मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचविणे, योजनांची अंमलबजावणी करणे तसेच शेतकऱ्यांना आवश्यक कृषी मार्गदर्शन देताना अडचणी येत आहेत. तसेच कार्यालयीन दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
त्यामुळे रावेर व यावल तालुका कृषी कार्यालयातील रिक्त पदे नियमानुसार पदभरती प्रक्रियेद्वारे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.
पीक विम्याच्या प्रश्नांवरही चर्चा
दरम्यान, रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याशी संबंधित प्रश्नांवरही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. पीक विम्याचा लाभ मिळताना शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी, संबंधित प्रक्रिया आणि प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार जावळे यांनी कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत