कृषी शिक्षणासोबत प्रात्यक्षिक ज्ञानावर भर डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
कृषी शिक्षणासोबत प्रात्यक्षिक ज्ञानावर भर
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रथम वर्षाच्या नवोदित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी कृषी क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून, केवळ पदवी संपादन करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवाला अधिक महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन केले. कृषी क्षेत्रात सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कौशल्यविकासावरही भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
महाविद्यालयातील कृषी कॅम्पस, विविध प्रयोगशाळा तसेच संशोधनाच्या सुविधा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रात्यक्षिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या सुविधांचा पुरेपूर उपयोग करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
नियमित वर्गांना उपस्थित राहिल्यामुळे विषयातील संकल्पना अधिक स्पष्ट होतात तसेच प्राध्यापकांशी थेट संवाद साधून विद्यार्थ्यांना त्यांच्या शंकांचे निरसन करून घेता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित वर्गांना उपस्थित राहून शंभर टक्के उपस्थितीचे ध्येय ठेवावे. अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक अनुभव आत्मसात करून भविष्यातील कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पूनमचंद सपकाळे, उपप्राचार्य प्रविण देवरे, प्रशासकीय अधिकारी मोहन सूर्यवंशी यांच्यासह प्रा. शरद पाटील, प्रा. निलेश सदर, प्रा. वैभव पाटील, डॉ. ज्ञानेश्वर सिंग, डॉ. अंकित आलोक, प्रा. कार्तिक खर्चे, प्रा. गौरव बाविस्कर, प्रा. सुशील चव्हाण, प्रा. प्रियल राठी, प्रा. सायली विधाटे, प्रा. जागृती ठाकरे, प्रा. माधुरी भोळे आदी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया देशमुख व पार्थ पवार यांनी केले. डॉ. ज्ञानेश्वर सिंग यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत