रोझोदा येथील जि. प. शाळेत मोफत गणवेश वाटप राजेंद्र चौधरी दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम; सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे गणवेश
रोझोदा येथील जि. प. शाळेत मोफत गणवेश वाटप
राजेंद्र चौधरी दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम; सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे गणवेश
लेवाजगत न्यूज रोझोदा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणासाठी मोफत गणवेशाचे वाटप शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आले. रोझोदा येथील रहिवासी तथा मुंबईतील बोरीवली येथील हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयात गेल्या २७ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले लेखक, कवी व पत्रकार राजेंद्र तुळशीराम चौधरी आणि त्यांच्या पत्नी स्वाधिनता राजेंद्र चौधरी यांच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष तथा महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून वैकुंठवासी डिगंबर महाराज मठ, पंढरपूरचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे (फैजपूर), रोझोदा लोकशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश महाजन, श्रीराम मंदिर व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन तसेच लोकनियुक्त सरपंच पुष्कर फेगडे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे गणवेश वितरित करण्यात आले. यावेळी रविंद्र चौधरी व राजेंद्र चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद वायकोळे यांनी केले. प्रमुख पाहुणे नरेंद्र नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी सामाजिक व शैक्षणिक कार्याचे महत्त्व विशद करून चौधरी दाम्पत्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी प्रगती विद्यालयाच्या नवनियुक्त मुख्याध्यापिका बोरोल यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रगती विद्यालयाच्या शिक्षिका दोडके यांनी केले, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका पालकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास नानासाहेब सुधाकर महाजन, उपसरपंच नारायण राणे, लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष ललित धांडे, डॉ. मिलिंद वायकोळे, रविंद्र चौधरी, माजी उपसरपंच चेतन भारंबे, रविंद्र धांडे, सुनील राणे, टेनूदास फेगडे, लक्ष्मण धांडे, पिंटू भारंबे, माजी सरपंच दीपक धांडे, भूषण चौधरी, अमर चौधरी, बंडू नेहेते, शंकर पाटील, किशोर बावस्कर, प्रेम चौधरी, संजय चौधरी, संजय राणे, वासुदेव चौधरी, हर्षल सरोदे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, पत्रकार प्रवीण पाटील, योगेश सैतवाल, पंकज पाटील, राजेश चौधरी, देवेंद्र चौधरी, रविंद्र महाजन तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौधरी दाम्पत्याने विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत