सावदा येथे ११०० नव्हे, ११११ दिव्यांचा भव्य दीपोत्सव राष्ट्रासाठी विधायक संकल्पाचा संदेश; श्री स्वामिनारायण मंदिरात भक्तिमय वातावरण
सावदा येथे ११०० नव्हे, ११११ दिव्यांचा भव्य दीपोत्सव
राष्ट्रासाठी विधायक संकल्पाचा संदेश; श्री स्वामिनारायण मंदिरात भक्तिमय वातावरण
लेवाजगत न्यूज सावदा : १७ सप्टेंबर हा संकल्प दिन म्हणून साजरा करताना येथील श्री स्वामिनारायण मंदिरात ११११ दिव्यांचा भव्य दीपोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राष्ट्रासाठी विधायक कार्य करण्याचा संकल्प तसेच समाजात सकारात्मक विचारांची ज्योत प्रज्वलित करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शास्त्री स्वामी भक्तिप्रियदासजी होते. व्यासपीठावर भंडारी स्वामी माधवप्रियदासजी, शास्त्री स्वामी श्री श्रीजी,नगरसेवक सचिन चुडामण बऱ्हाटे, नगरसेवक नकुल नितीन बेंडाळे, सावदा नगराध्यक्ष सौ. रेणुका राजेंद्र पाटील, नगरसेविका सौ. प्रतीक्षा मनीष भंगाळे, नगरसेविका सौ. सुनीता संजय तायडे, नगरसेविका कु. सिमरन राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष राजेश गजाननराव वानखेडे, जे. के. भारंबे, मनीष भंगाळे तसेच मंदिराचे ट्रस्टी चंद्रशेखर शिवराम पाटील, धनंजय वासुदेव चौधरी, शिवाजी भागवतराव भारंबे आदी उपस्थित होते.
यावेळी महिला व पुरुष हरिभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ११११ दिवे प्रज्वलित केले. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर उजळून निघाला आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
अध्यक्षीय मनोगतात शास्त्री स्वामी भक्तिप्रियदासजी यांनी मंदिरात आयोजित विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांना सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मंदिरातील कार्यक्रमांच्या माध्यमातून भगवंताचे सान्निध्य, सत्संग आणि संस्कार यांचा लाभ मिळतो, असे त्यांनी सांगितले. संकल्प दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नसून राष्ट्रहितासाठी विधायक संकल्प करून तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा दिवस असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा वाढदिवस असल्याने या निमित्तानेही मोठ्या संख्येने नागरिक व हरिभक्त मंदिरात उपस्थित होते. उपस्थितांनी सत्संगाचा लाभ घेतला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर पाटील यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत