Contact Banner

केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली सावदा येथे फैजपूर–सावदा मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

savda-faizpur-main-road-concrete-work-bhumipujan-raksha-khadse


केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली सावदा येथे फैजपूर–सावदा मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

लेवाजगत न्यूज सावदा (रावेर) : बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत फैजपूर शहर ते सावदा शहर या मार्गावरील समांतर मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन सावदा येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे होत्या. त्यांच्या उपस्थितीत  सोहळा पार पडला असून, कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.







यावेळी विधानपरिषद सदस्य  नंदकिशोर महाजन उपस्थित होते. तसेच सावदा शहराच्या नगराध्यक्षा  रेणुका राजेंद्र पाटील, गटनेत्या रंजना जितेंद्र भारंबे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र श्रीकांत चौधरी, माजी उपनगराध्यक्ष तथा हिंदुस्तान पेट्रोलियम पंपाचे संचालक हाजी शब्बीर हुसेन अख्तर हुसेन बोहरी उर्फ बाबुशेठ, नकुल बेंडाळे, सचिन बऱ्हाटे,नगरसेविका जयश्री नेहते नगरसेवक यांच्यासह पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

फैजपूर शहर ते सावदा शहर या मार्गावरील कि.मी. १८९.२४० ते २०४.५०० दरम्यानच्या एकूण १४.२३० कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी २७ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा शहरांना बायपास मार्ग उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शहरांतर्गत विद्यमान मुख्य रस्त्यांवरील वाहतूक, नागरिकांचे दैनंदिन दळणवळण तसेच व्यापारी व्यवहार सुरळीत राहावेत, यासाठी या समांतर रस्त्याचा विकास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

काँक्रीटीकरणामुळे फैजपूर–सावदा मार्ग अधिक मजबूत व टिकाऊ होणार असून, वाहनधारकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे. या मार्गावरून दररोज प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच व्यावसायिकांना या कामाचा मोठा फायदा होणार आहे.

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सावदा शहराचे फैजपूरसह परिसरातील दळणवळण अधिक गतिमान होऊन स्थानिक व्यापार व आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या विकासकामाकडे सावदा शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

कामाचे ठिकाण : फैजपूर शहर ते सावदा शहर
लांबी : १४.२३० कि.मी.
कि.मी. : १८९.२४० ते २०४.५००
मंजूर निधी : ₹२७.९९ कोटी

या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाला सुरुवात झाल्याने सावदा शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, काम दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.