Contact Banner

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गिरीजात्मजाचा जन्मोत्सव उत्साहात

 

shree-kshetra-lenyadri-shree-girijatmja-ganesh-birth-anniversary-celebration

श्री क्षेत्र लेण्याद्री येथे श्री गिरीजात्मजाचा जन्मोत्सव उत्साहात

उरण : सुनील ठाकूर-

भाद्रपद श्री गणेश चतुर्थीनिमित्त सोमवारी (दि. १४ सप्टेंबर २०२६) अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र लेण्याद्री, ता. जुन्नर येथे श्री गिरीजात्मज गणेशाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रींच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे संपूर्ण लेण्याद्री परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ६.१५ वाजता देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी श्रींचे दर्शन खुले करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत ह.भ.प. नामदेव महाराज वाळके यांचे देव जन्माचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर पारंपरिक पद्धतीने श्री गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गिरीजात्मज गणेशमूर्ती तसेच मंदिर परिसराची फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. देवाच्या नैवेद्यासाठी मुंबई येथील फळ व्यापारी राम मारुती कोकणे यांनी विविध प्रकारची दोन कॅरेट फळे, तर गोळेगाव येथील संजय पांडुरंग वाणी यांनी दोन कॅरेट केळी प्रसाद म्हणून दिली.

मंदिरात सकाळी ७ वाजता, दुपारी १२.१५ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता महाआरती करण्यात आली. दिवसभर विविध धार्मिक विधी पार पडले. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने गर्दीचे नियोजन करण्यात आले होते. तसेच भाविकांसाठी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सेक्रेटरी शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

जुन्नर परिसरासह पुणे, नगर, मुंबई, ठाणे आणि नाशिक येथूनही मोठ्या संख्येने भाविक श्री गिरीजात्मजाच्या दर्शनासाठी लेण्याद्री येथे दाखल झाले. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही श्रींचे दर्शन घेतले.

ऋषीपंचमीला सामूहिक अथर्वशीर्ष पठण

मंगळवार (दि. १५ सप्टेंबर) रोजी ऋषीपंचमीनिमित्त सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत भाविक भक्तांसाठी सामूहिक श्री गणेश अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.