Contact Banner

दसनूरच्या उमेश्वर महादेव मंदिरात हरितालिकेनिमित्त महिलांची अलोट गर्दी

 

dasnur-umeshwar-mahadev-temple-hartalika-women-devotees-crowd

दसनूरच्या उमेश्वर महादेव मंदिरात हरितालिकेनिमित्त महिलांची अलोट गर्दी

दसनूर, ता. रावेर, जि. जळगाव | प्रतिनिधी : हेमंत चांदवे-

सिंगनूरजवळील दसनूर येथील स्वयंभू श्री उमेश्वर महादेव मंदिरात हरितालिका व्रतानिमित्त सोमवारी महिला भाविकांची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच पारंपरिक वेशभूषेत महिला हातात पूजेचे ताट व आवश्यक साहित्य घेऊन मंदिरात दाखल होत होत्या.

मंदिर परिसरात महिलांनी सामूहिक पूजा-अर्चा करून स्वयंभू उमेश्वर महादेवाचे भक्तिभावाने पूजन केले. हरितालिका व्रताच्या निमित्ताने दिवसभर मंदिर परिसरात दर्शनासाठी महिला भाविकांची सतत वर्दळ सुरू होती. मंदिरात दर्शन घेण्यासाठी तसेच पूजा करण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या होत्या.

विवाहित महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासह सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्यासाठी श्रद्धेने उपवास करून विधिवत पूजा केली. तर अविवाहित मुलींनी मनासारखा व उत्तम जीवनसाथी मिळावा, यासाठी हरितालिका व्रताचे पालन केले.

हरितालिकेनिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. सायंकाळनंतरही दर्शनासाठी महिलांची गर्दी कायम होती. उशिरापर्यंत मंदिर परिसरात भाविक महिलांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.