थॅलेसेमियामुक्त भारतासाठी योद्धे म्हणून एकत्र लढूया : डॉ. सई नेमाडे
थॅलेसेमियामुक्त भारतासाठी योद्धे म्हणून एकत्र लढूया : डॉ. सई नेमाडे
लेवाजगत न्यूज फैजपूर : थॅलेसेमिया या आजारामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाज दुर्धर व्याधीच्या विळख्यात अडकत चालला आहे. रक्ताची अनुपलब्धता, उपचारांचा वाढता खर्च तसेच शारीरिक व मानसिक त्रास यापासून स्वतःसह कुटुंब आणि समाजाला वाचविण्यासाठी थॅलेसेमियामुक्त भारताच्या लढ्यात योद्धे म्हणून एकत्र येऊया, असे आवाहन प्लास्मा ब्लड बँक, जळगावच्या संचालिका डॉ. सई नेमाडे यांनी केले.
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित व्याख्यान सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे होते. उपप्राचार्य डॉ. मनोहर सुरवाडे, उपप्राचार्य डॉ. हरीश नेमाडे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत थॅलेसेमिया आजाराबाबत जनजागृती पोहोचावी, या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सई नेमाडे यांनी पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून थॅलेसेमिया आजाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचारांतील आव्हाने तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी थॅलेसेमियासारख्या गंभीर आजाराची माहिती अत्यंत सोप्या भाषेत दिल्याबद्दल डॉ. सई नेमाडे यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी या आजाराबाबत सजग व सतर्क राहून आपल्या कुटुंबासह समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन कोसला फाउंडेशन, जळगाव आणि धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत