तोडलेल्या फांद्या रस्त्यावर सोडल्यास महावितरणवर गुन्हा मक्तेदाराला ६१० रुपये मिळूनही अस्वच्छता पसरवल्याने कारवाईचा इशारा
तोडलेल्या फांद्या रस्त्यावर सोडल्यास महावितरणवर गुन्हा
मक्तेदाराला ६१० रुपये मिळूनही अस्वच्छता पसरवल्याने कारवाईचा इशारा
![]() |
| लेवाजगत मार्फत जाहिरात प्रसिद्धी |
जळगाव : वीज तारांवरील झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर त्या रस्त्यावरच सोडून अस्वच्छता निर्माण करणाऱ्या महावितरणला जळगाव महानगरपालिकेने आता दणका देण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या परवानगीने फांद्या छाटल्यानंतर त्या तातडीने उचलण्याची जबाबदारी महावितरण आणि संबंधित मक्तेदारांचीच राहणार आहे. फांद्या रस्त्यावरच सोडल्यास वाहतूक कोंडी तसेच अस्वच्छता निर्माण होत असल्याने संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा मनपाच्या वृक्ष प्राधिकरणाने दिला आहे.
मंगळवारी मनपा आयुक्त आदित्य जिवने यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त पंकज गोसावी, समिती सदस्य नितीन लढा, आशिष हाडा यांच्यासह संबंधित अधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीत विविध भागांतील झाडे व फांद्या छाटण्याच्या प्रस्तावांसोबतच महावितरणकडून करण्यात येणाऱ्या फांदी छाटणीच्या कामाबाबतही चर्चा झाली.
आता पूर्वसूचना देणे बंधनकारक
महावितरणने कोणत्याही भागात वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यापूर्वी संबंधित प्रभागातील मनपा अभियंत्यांना लेखी स्वरूपात पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच फांद्या छाटण्याची आणि त्यानंतर त्या तातडीने उचलण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.
मक्तेदाराला ६१० रुपये मिळूनही कचरा रस्त्यावर
फांद्या छाटण्यासाठी संबंधित मक्तेदाराला ६१० रुपये मिळत असतानाही अनेक ठिकाणी फांद्या रस्त्यावरच टाकून दिल्या जात असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच परिसरात अस्वच्छता पसरत असल्याने मनपाने यापुढे कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नियम मोडल्यास थेट गुन्हा
नवीन धोरणानुसार फांद्या तोडल्यानंतर त्या जागेवरच उचलण्याची जबाबदारी महावितरणची असेल. नियमांचे पालन न केल्यास संबंधित महावितरण अधिकारी तसेच मक्तेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आगामी महासभेत ठेवण्यात येणार आहे.
“तोडलेल्या झाडांच्या फांद्या उचलण्याची जबाबदारी महावितरणचीच आहे. याबाबत समितीच्या बैठकीत धोरण ठरवण्यात आले असून ते आता महासभेपुढे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे.”
— पंकज गोसावी, उपायुक्त, मनपा जळगाव


कोणत्याही टिप्पण्या नाहीत