निष्काम समाजसेवेतूनच समाजात प्रतिष्ठा मिळते : डॉ. रवींद्र भोळे
निष्काम समाजसेवेतूनच समाजात प्रतिष्ठा मिळते : डॉ. रवींद्र भोळे
उरुळी कांचन : गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उरुळी कांचन येथील ज्येष्ठ समाजसेवक व प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे महाराज यांची प्राथमिक आरोग्य केंद्रातील जन आरोग्य समिती सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच महंत गोपाल व्यास कपाटे महाराज यांची पोलीस दक्षता समितीवर निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव कांचन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. रवींद्र भोळे म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांहून अधिक काळ आपण सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, कम्युनिटी हेल्थ वर्क, अध्यात्मिक, अपंग सेवा, वृक्षारोपण, पर्यावरण संतुलन, नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदत, व्यसनमुक्ती तसेच पूरग्रस्तांना सहाय्य अशा विविध क्षेत्रांत समर्पित भावनेने कार्य केले आहे. तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये संस्थात्मक स्वरूपातही कार्य करण्याची संधी मिळाली.
“या प्रदीर्घ सेवाकार्याची दखल घेऊन आज माझा सन्मान करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून त्यांना प्रोत्साहन व सन्मान देण्याचे कार्य शिवाजीराव कांचन करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. निस्वार्थी, त्यागमय, समर्पित आणि निष्काम कर्म केल्यामुळेच समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते,” असे मत डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास महा सुपरफास्ट न्यूजच्या संपादिका सुवर्णाताई कांचन, पत्रकार सुनीलजी तुपे, महाराष्ट्र भूमीचे पत्रकार बापू चौधरी, दैनिक केसरीचे प्रभात अमोलजी भोसले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत