Contact Banner

उरणवासीयांनी भेंडखळ ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा : तुळशीदास पाटील

 

uran-residents-should-follow-the-example-of-bhendkhal-villagers-tulsidas-patil

उरणवासीयांनी भेंडखळ ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा : तुळशीदास पाटील

उरण : सुनील ठाकूर






उरण तालुक्यातील धार्मिक आणि सामाजिक परंपरा जपणाऱ्या गावांमध्ये भेंडखळ गावाचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. गावाने अनेक वर्षांपासून श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंडपणे जपली असून, या माध्यमातून भक्ती, वारकरी संस्कृती आणि धार्मिक शिस्तीचे दर्शन घडविले जात आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील इतर गावांनीही भेंडखळ ग्रामस्थांचा आदर्श घ्यावा, असे मत तुळशीदास पाटील यांनी व्यक्त केले.

भेंडखळ येथील विठ्ठल मंदिरात श्रावण महिन्यात सात दिवस हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहात भाविक रात्रंदिवस विठ्ठल नामस्मरण, हरिपाठ आणि ईश्वराचे नामचिंतन करीत भक्तीमय वातावरण निर्माण करतात. सप्ताहादरम्यान भाविक पारंपरिक पद्धतीने पांढऱ्या रंगाचे साधे वस्त्र परिधान करून मंदिरात सहभागी होतात.

या सप्ताहाला उरण परिसरातील विविध गावांमधून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा गजर करतात. सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक उपक्रमामुळे भेंडखळ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.

पूर्वी उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये श्रावण महिन्यात सप्ताहाचे आयोजन केले जात होते. गावोगावी असलेल्या मंदिरांमध्ये भाविक एकत्र येऊन हरिनाम, भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत. मात्र, कालांतराने अनेक ठिकाणी ही परंपरा कमी होत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांनी याबाबत आत्मपरीक्षण करून आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.

ईश्वराचे नामस्मरण केवळ संकटाच्या काळातच न करता नियमितपणे भक्ती आणि सदाचाराची परंपरा जोपासली पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या या भक्तीपरंपरेचे खरेखुरे वारस भेंडखळ ग्रामस्थ असल्याचे सांगत, त्यांच्या धार्मिक उपक्रमांचा आदर्श उरण तालुक्यातील जनतेने घ्यावा, असे आवाहन तुळशीदास पाटील यांनी केले.

दरम्यान, विठोबा देवस्थान, भेंडखळ हे धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असून येथील हरिनाम सप्ताहाची परंपरा अत्यंत प्रेरणादायी आहे, असे मत विठ्ठल देवस्थानचे अध्यक्ष उद्धव घरत यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.