भुसावळ येथे संत सेना महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन
भुसावळ येथे संत सेना महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन
१ ते ८ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; नाभिक समाज बांधवांना उपस्थितीचे आवाहन
सिंगणूर, ता. रावेर : भुसावळ शहर नाभिक संघाच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळा तसेच संत सेना महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दि. १ ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जामनेर रोड येथील संत सेना महाराज सामाजिक सभागृहात हा धार्मिक उत्सव उत्साहात पार पडणार आहे.
या उत्सवात संगीतमय अखंड हरिनाम सप्ताह, भजन, पूजन-विधी, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. संत सेना महाराजांच्या मूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढून मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
दि. २ सप्टेंबर रोजी गणेशपूजन व नवग्रहपूजनानंतर सकाळी अष्टभुजा मंदिर ते संत सेना महाराज मंदिर अशी मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. ३ सप्टेंबर रोजी क्षेत्रपाल मंडळ, रुद्र मंडळ व अग्निस्थापनेसह विविध पूजाविधींना प्रारंभ होईल. यावेळी कथा, हरिपाठ, प्रवचनसेवा व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ४ सप्टेंबर रोजी संत सेना महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पार पडणार असून, सायंकाळी कीर्तनासह विविध धार्मिक विधी होणार आहेत. दि. ५ सप्टेंबर रोजी खाटू श्याम भजन, कथा व कीर्तन, तर दि. ६ सप्टेंबर रोजी सुंदरकांड व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ७ सप्टेंबर रोजी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ सप्टेंबर रोजी संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त भजन-दिंडी सोहळा, पालखी पूजन व सत्कार समारंभ होणार आहे. याच दिवशी संगीतमय श्रीमद् भागवत कथा व कीर्तनाचा समारोप होणार असून, ह.भ.प. उमेश महाराज संनासे, भुसावळकर निरूपण करणार आहेत. कार्यक्रमाच्या समारोपानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
हा धार्मिक उत्सव यशस्वी करण्यासाठी नाभिक संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. परिसरातील सर्व नाभिक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत