Contact Banner

किनगाव-मालोद शिवारात वीजतारा चोरी करणारे रॅकेट उद्ध्वस्त; ११ जेरबंद

 

yawal-kinagaon-malod-electric-wire-theft-racket-busted-11-arrested

किनगाव-मालोद शिवारात वीजतारा चोरी करणारे रॅकेट उद्ध्वस्त; ११ जेरबंद

भंगार व्यावसायिकासह चौघे रंगेहाथ पकडले; रात्रीच्या शोधमोहीमेत आणखी सात जण ताब्यात, १ लाख ४८ हजार २५० रुपयांच्या कॉपर वायरी जप्त


yawal-kinagaon-malod-electric-wire-theft-racket-busted-11-arrested
लेवाजगत मार्फत जाहिरात प्रसिद्धी 


यावल प्रतिनिधी सुनील मेघे : यावल तालुक्यातील किनगाव आणि मालोद शिवारात महावितरणच्या वीजतारा चोरी करून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा यावल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. किनगाव-मालोद रस्त्यावरील शेतशिवारात चोरीच्या वीजतारांचे तुकडे करून त्यांचे गठ्ठे बांधत असताना आणि ते चारचाकी वाहनात भरताना शेतकऱ्यांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चार जणांना ताब्यात घेतले. रात्रीच राबविलेल्या शोधमोहीमेत आणखी सात जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत ११ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत.

पोलिसांनी कारसह कापलेल्या वीजतारा, कॉपर केबल व इतर साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे टोळीचा पर्दाफाश

किनगाव-मालोद रस्त्यावरील शेतशिवारात रात्रीच्या सुमारास काही जण वीजतारा कापून वाहनात भरत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने शेतकऱ्यांनी त्यांना जागीच पकडून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून सुपडू हमजान तडवी (३३, रा. मालोद, ह.मु. काजीपुरा, सावदा), करीम नशीर तडवी (२४, रा. तडवी वाडा, नायगाव), अलाउद्दीन मजीद तडवी (२३, रा. नायगाव) आणि आरिफ युसूफ मन्यार (४२, रा. सोनार गल्ली, किनगाव बुद्रुक) यांना ताब्यात घेतले.

यापैकी आरिफ मन्यार हा भंगार व्यावसायिक असून चोरीचे वीजतार खरेदी करण्यासाठी आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

११ केव्ही व ३३ केव्ही वाहिनीचे तार जप्त

पोलिसांनी आरोपींकडून लघुदाब, ११ केव्ही तसेच ३३ केव्ही वाहिनीचे कटिंग केलेले वीजतार आणि चारचाकी वाहन जप्त केले. MH 43 AJ 5864 क्रमांकाची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

या कारवाईनंतर पोलिसांनी रात्रीच शोधमोहीम राबवून आणखी सात संशयितांना ताब्यात घेतले. मालोद येथून आरिफ तडवी, हैदर तडवी, अफसर तडवी, कुबुद्दीन तडवी, विनोद तडवी, सलीम तडवी आणि एका १७ वर्षीय अल्पवयीन बालकाचा त्यात समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेतकऱ्यांच्या शेतातून लाखोंची कॉपर वायर चोरी

गोपाळ बारी, विलास पाटील, गिरीश पाटील, शांताराम कोळी, रवींद्र पाटील, पवन पाटील, सतीश पाटील व प्रभाकर पाटील यांच्या शेतातून १ लाख ४८ हजार २५० रुपये किमतीच्या कॉपर वायरी चोरीस गेल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी अनिल उर्फ शेखर आत्माराम चौधरी (रा. साकळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे.

चोरीची साखळी कार्यरत असल्याचा संशय

पोलिसांच्या तपासात शेतशिवारातील वीजतारा कापणारे, त्यांचे गठ्ठे तयार करणारे, रात्रीच्या वेळी वाहनातून वाहतूक करणारे आणि चोरीचे साहित्य खरेदी करणारे भंगार व्यावसायिक अशी साखळी कार्यरत असल्याचा संशय आहे. ही टोळी प्रथम शेतशिवाराची पाहणी करून चोरीसाठी ठिकाण निश्चित करत असल्याची माहिती तपासात समोर येत आहे.

या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण, तसेच चोरीचे साहित्य कुठे आणि कोणाला विकले जात होते, याचा तपास सुरू आहे. आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डीवायएसपी अनिल बडगुजर यांनी यावल पोलिस ठाण्याला भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली आणि तपासाबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक फौजदार वसंतराव बेलदार, हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी आणि सचिन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.