सावदा पालिका संचालित शाळेचे क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश! वेटलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णपदके; धनुर्विद्या व मैदानी स्पर्धेतही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
सावदा पालिका संचालित शाळेचे क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश!
वेटलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णपदके; धनुर्विद्या व मैदानी स्पर्धेतही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
सावदा (प्रतिनिधी) : सावदा नगरपालिका संचालित श्रीमती आनंदीबाई गंभिरराव हायस्कूल व श्री. नामदेवराव गोमाजीराव पाटील उदळीकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
अमरावती येथे दि. १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या राज्यस्तरीय १७ वर्षांखालील वेटलिफ्टिंग स्पर्धेत रोहन कन्हैया भालेराव याने ६० किलो वजनगटात एकूण २२२ किलो, तर शुभम पप्पू चंडाले याने ७९ किलो वजनगटात एकूण २४८ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे.
तसेच, १९ वर्षांखालील धनुर्विद्या स्पर्धेत जिज्ञासा प्रशांत भारंबे हिने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले. तर जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत कोमल दयाराम कोळी हिने हातोडाफेक प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष श्री. फिरोज खाँ पठाण, शिक्षण सभापती श्री. सचिन चुडामण बऱ्हाटे, मुख्याधिकारी श्री. भूषण वर्मा आणि प्राचार्य श्री. संजय मोतीराम महाजन यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री. अनिल नेमाडे, शिक्षकवृंद तसेच वेटलिफ्टिंगसाठी सूर्या जिमचे श्री. अविनाश महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयासह सावदा शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत