Contact Banner

जन्मनोंदीच्या वादात नगरसेवक शेख निसार हमीद अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Yawal-Nagarparishad-Sheikh-Nisar-Hamid-Disqualified-Councillor-Birth-Record-Controversy


यावल नगरपरिषद निवडणूक : जन्मनोंदीच्या वादात नगरसेवक शेख निसार हमीद अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय


लेवाजगत न्यूज यावल : यावल नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकपदाच्या पात्रतेवरून सुरू असलेल्या वादात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. तक्रारदार उमेश रेवा फेगडे यांचा अर्ज मंजूर करत नगरसेवक शेख निसार हमीद यांना नगरसेवकपदासाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे यावलच्या स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


सन २०२६ च्या नगरपरिषद निवडणुकीत शेख निसार हमीद यांनी सादर केलेल्या शपथपत्रात १२ सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेल्या अपत्यांची संख्या शून्य असल्याचे नमूद केले होते. मात्र, त्यांच्या चौथ्या अपत्याचा जन्म ६ जून २००३ रोजी झाल्याचा दावा तक्रारदार उमेश फेगडे यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.


या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान यावल नगरपरिषदेतील जन्मनोंदवहीतील नोंदी महत्त्वाच्या ठरल्या. संबंधित अपत्याची जन्मतारीख ६ जून २००३ अशी नोंद असल्याचे तसेच माहिती देणारी व्यक्ती म्हणून शेख निसार हमीद यांचे नाव व स्वाक्षरी नोंदवहीत असल्याचे समोर आले. यावलमधील दोन शाळांच्या अभिलेखांमध्येही संबंधित अपत्याची जन्मतारीख याच दिवशी असल्याची नोंद आढळून आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.


दुसरीकडे, शेख निसार हमीद यांनी संबंधित अपत्याचा जन्म २१ ऑगस्ट २००१ रोजी भुसावळ येथे झाल्याचा दावा करत भुसावळ नगरपरिषदेतील नोंद आणि रुग्णालयाचा अहवाल सादर केला होता. तसेच यावल नगरपरिषदेतील जन्मनोंद चुकीची असून ती रद्द करण्यासाठी स्वतंत्र अर्ज केल्याचेही त्यांनी सांगितले होते.


मात्र, यावल नगरपरिषदेतील जन्मनोंद आणि शालेय अभिलेखांतील नोंदी परस्परांशी सुसंगत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. संबंधित जन्मनोंद रद्द करण्याची प्रक्रिया अद्याप अंतिम झालेली नसल्याने विद्यमान अधिकृत नोंद ग्राह्य धरण्यात आली.


अखेर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी उमेश फेगडे यांचा अर्ज मंजूर करत शेख निसार हमीद यांना नगरसेवकपदासाठी अपात्र घोषित केले.


राजकीय समीकरणांवर परिणाम


या निर्णयामुळे यावल नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार, भाजपचे आठ नगरसेवक असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्यासह एकूण १२ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याचे नमूद करण्यात आले होते. दुसरीकडे, लोकनियुक्त नगराध्यक्षांना काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रत्येकी तीन नगरसेवकांचा पाठिंबा असल्याने त्यांच्या बाजूचे संख्याबळ १२ होते. आता एका नगरसेवकाला अपात्र ठरविण्यात आल्याने पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.