Contact Banner

अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप अकराव्या वर्षात; ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी होणार गोड

 

antarnaad-pratishthan-vatibhar-faral-diwali-tribal-families-bhusawal

अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप अकराव्या वर्षात; ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी होणार गोड

भुसावळ : प्रतिनिधी

दिवाळीचा आनंद प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचावा आणि वंचित कुटुंबांच्याही आयुष्यात सणाचा गोडवा फुलावा, या सामाजिक भावनेतून भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘वाटीभर फराळ द्या, वंचितांचे तोंड गोड करा’ या उपक्रमाचे यंदा अकरावे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत ७ नोव्हेंबर रोजी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यावर दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून, त्याच्या नियोजनासाठी रविवार, २५ ऑक्टोबर रोजी बैठक घेण्यात आली. समाजातील प्रत्येक घटकाला सण-उत्सवांचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने प्रतिष्ठानने २०१६ मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. 

         पहिल्या वर्षी चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा प्रवास पुढे विविध दुर्गम आदिवासी वस्त्यांपर्यंत पोहोचला. जोगलखोरी, जुनी मोहमांडली, काळाडोह, मोर धरण, विटवा, आसराबारी, जामुन झिरा, डोंगरदे, गायरान, नागदेवी, लसणीबर्डी आणि माथन यांसारख्या वस्त्यांमध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिवाळीचा आनंद पोहोचविण्यात आला आहे. 

          



       यंदाही शहरातील नागरिक आणि दात्यांच्या सहकार्याने फराळ, कपडे, चपला-बूट, शालेय साहित्य तसेच किराणा साहित्य संकलित करून आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली जाणार आहे. आर्थिक मदतीसोबतच वस्तुरूपाने योगदान देण्याची संधीही या उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वच्छ धुतलेले व इस्त्री केलेले वापरण्यायोग्य जुने कपडे, नवीन कपडे, दप्तर, शालेय साहित्य, स्वेटर, ब्लँकेट आणि इतर आवश्यक वस्तू देऊन नागरिक या सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात. गतवर्षी या उपक्रमांतर्गत जवळपास ४५० नागरिकांना फराळ, कपडे, चपला, शालेय साहित्य, साखर आणि तांदळाचे वाटप करण्यात आले होते. यंदा हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा प्रयत्न असून, इच्छुक दात्यांनी आपले योगदान ४ नोव्हेंबरपर्यंत प्रतिष्ठानकडे सुपूर्द करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन वंचित कुटुंबांच्या दिवाळीत आनंदाची भर घालावी, असे आवाहन प्रकल्पप्रमुख योगेश इंगळे, समन्वयक प्रसन्ना बोरोले, सहसमन्वयक जीवन महाजन आणि समाधान जाधव यांनी केले आहे.

 


          उपक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, डॉ. संजू भटकर, शैलेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, राहुल भारंबे, विक्रांत चौधरी, हितेंद्र नेमाडे, अमित चौधरी, अमितकुमार पाटील, देव सरकटे, राजू वारके, हरीश भट, डॉ. प्रा. श्याम दुसाने, तेजेंद्र महाजन, भूषण झोपे, विपिन वारके, कपिल धांडे, ललित महाजन, उमेश फिरके, केतन महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, शिरीष कोल्हे, प्रमोद पाटील, निवृत्ती पाटील, सचिन पाटील, जीवन सपकाळे, मंगेश भावे, योगेश साळुंके, किशोर नेहेते, दीपक नेहेते आणि हर्षा पाटील यांच्यासह अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील व प्रतिष्ठानचे स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. वंचितांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.