सातपुड्यातील आदिवासी पाड्यातील कन्येची वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
मोहिनी भुगवाड्या ठरल्या गावातील पहिल्या महिला डॉक्टर; आदिवासी पाड्याचा नावलौकिक वाढवला!
सातपुड्यातील आदिवासी पाड्यातील कन्येची वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
प्रतिनिधी | यावल
यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या वाघझिरा या आदिवासी पाड्यातील मोहिनी मानासिंग भुगवाड्या यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एमडी रेडिओलॉजी ही उच्च पदवी प्राप्त करून त्यांनी आपल्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या गावातून ही पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला डॉक्टर ठरल्या आहेत.
मोहिनी यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात यश मिळवले. आदिवासी आणि दुर्गम भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या कामगिरीमुळे वाघझिरा गावासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मोहिनी यांचे वडील मानासिंग भुगवाड्या हे नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या आई नवादी भुगवाड्या या माळोद येथील आरोग्य केंद्रात कंत्राटी आरोग्यसेविका म्हणून सेवा बजावत आहेत. आई-वडिलांच्या शैक्षणिक आणि सेवाभावी पार्श्वभूमीचा तसेच मोहिनी यांच्या स्वतःच्या अथक परिश्रमांचा त्यांच्या यशात महत्त्वाचा वाटा आहे.
मोहिनी यांनी यापूर्वी एमबीबीएसचे शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. त्यानंतर मुंबईतील नामांकित रुग्णालयात एमडी रेडिओलॉजीचे उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. दुर्गम आदिवासी भागातून पुढे येत वैद्यकीय क्षेत्रात उच्च पदवी संपादन करणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी मोहिनी यांचे यश प्रेरणादायी ठरणार आहे. योग्य ध्येय, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशामुळे वाघझिरा गावाचा नावलौकिक वाढला असून, परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत