Contact Banner

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात नीट, जेईई परीक्षांबाबत मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन आणि नियमित सरावावर भर द्यावा : नेमीवंत धांडे

 

dhanaji-nana-junior-college-faizpur-neet-jee-guidance

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात नीट, जेईई परीक्षांबाबत मार्गदर्शन

विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन आणि नियमित सरावावर भर द्यावा : नेमीवंत धांडे

फैजपूर, ता. यावल | प्रतिनिधी : येथील धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नीट (NEET) आणि जेईई (JEE) या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जळगाव येथील प्रसिद्ध धांडे क्लासेसचे संचालक नेमीवंत धांडे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबींविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे होते. मार्गदर्शन करताना नेमीवंत धांडे म्हणाले की, नीट आणि जेईई या परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास करून चालत नाही, तर वेळेचे योग्य नियोजन, परीक्षेच्या स्वरूपाची माहिती, प्रश्नपत्रिकांचा सराव आणि सातत्यपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. निगेटिव्ह मार्किंग टाळण्यासाठी प्रश्न काळजीपूर्वक सोडवणे आणि प्रश्नांच्या काठिण्यपातळीचा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे.

इयत्ता १२ वीच्या अभ्यासासोबतच ११ वीच्या अभ्यासक्रमालाही तितकेच महत्त्व द्यावे. नियमितपणे प्रश्नपत्रिका सोडवून त्यांचे विश्लेषण करावे. नीट व जेईईच्या तयारीसोबतच बोर्डाच्या परीक्षेचाही अभ्यास व्यवस्थित करावा. मोबाईल आणि ऑनलाइन माध्यमांमध्ये अनावश्यक वेळ न घालवता प्रत्यक्ष अभ्यासावर भर द्यावा. स्पर्धा मोठी असली, तरी मेहनत, सातत्य आणि योग्य नियोजनाच्या जोरावर यश मिळवता येते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

यानंतर प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना नीट व जेईई परीक्षांचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींची माहिती देत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप बोदडे यांनी केले. त्यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शनही त्यांनीच केले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. उत्पल चौधरी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.