शहीद जितेंद्र कोल्हे यांना वीरपत्नी व कुटुंबीयांकडून भावपूर्ण आदरांजली शहीद दिनानिमित्त वीर जवानाच्या शौर्याचे स्मरण; रोझोदा येथे अभिवादन
शहीद जितेंद्र कोल्हे यांना वीरपत्नी व कुटुंबीयांकडून भावपूर्ण आदरांजली
शहीद दिनानिमित्त वीर जवानाच्या शौर्याचे स्मरण; रोझोदा येथे अभिवादन
रोझोदा, दि. १९ ऑक्टोबर २०२६ | लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) शूर जवान शहीद जितेंद्र दिगंबर कोल्हे यांच्या शहीद दिनानिमित्त आज, १९ ऑक्टोबर रोजी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांच्या वीरपत्नी भारती जितेंद्र कोल्हे, कन्या खुशबू जितेंद्र कोल्हे, सीआरपीएफचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शहीद जितेंद्र दिगंबर कोल्हे यांचा जन्म १२ सप्टेंबर १९७४ रोजी झाला. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत त्यांनी १९९३ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती होऊन देशसेवेचा मार्ग स्वीकारला. देशातील विविध दुर्गम भागांत त्यांनी कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली.
दरम्यान, १९ ऑक्टोबर २००० रोजी आसाम येथे सीआरपीएफच्या १२९ व्या बटालियनमध्ये कार्यरत असताना दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी जवानांची गस्त सुरू होती. यावेळी अचानक समोरून अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. या चकमकीत शहीद जितेंद्र कोल्हे यांनी अदम्य साहस दाखवत प्रतिकार केला. मात्र, या संघर्षात गोळ्या लागल्याने त्यांना वीरमरण आले. देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान आजही प्रेरणादायी आहे.
त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त वीरपत्नी भारती जितेंद्र कोल्हे आणि कन्या खुशबू जितेंद्र कोल्हे यांनी शहीद जवानाला भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी सीआरपीएफचे उपनिरीक्षक (SI) कुमार नायक, हवालदार चंद्रशेखर महाले, रोझोदा ग्रामपंचायतीचे सरपंच पुष्कर फेगडे, उपसरपंच नारायण राणे, भूषण राणे, शांतनू फेगडे, यशपाल धांडे, सोनू मेढे, ललित फेगडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीद जितेंद्र कोल्हे यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा वारसा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या बलिदानाला कोटी कोटी प्रणाम!


कोणत्याही टिप्पण्या नाहीत