Contact Banner

धुळ्यात विषप्रयोगाने १६ भटक्या श्वानांचा मृत्यू; सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू देवपूर परिसरातील संतापजनक घटना; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

 

dhule-16-stray-dogs-poisoning-case-devpur

धुळ्यात विषप्रयोगाने १६ भटक्या श्वानांचा मृत्यू; सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू

देवपूर परिसरातील संतापजनक घटना; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

धुळे | प्रतिनिधी--



धुळे शहरातील देवपूर भागातील वाडीभोकर रोड परिसरात भटक्या श्वानांना विषारी खाद्यपदार्थ देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुशांत कॉलनी आणि सुवर्णनगर परिसरात घडलेल्या या प्रकारात तब्बल १६ श्वानांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शुक्रवारी सायंकाळपासून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. शनिवारी सकाळपासून परिसरात श्वानांचे मृतदेह आढळून येऊ लागले. दुपारपर्यंत मृत श्वानांची संख्या १६ वर पोहोचली. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित कैद

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोन व्यक्ती श्वानांसाठी खाद्यपदार्थ टाकत असल्याचे दिसून आले. या खाद्यपदार्थातून विष दिले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी स्थानिक रहिवासी ऋषिका उत्तम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार इकलाख पठाण या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

शवविच्छेदनात विषबाधेचा संशय स्पष्ट

मृत श्वानांचे पारोळा रोडवरील पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तपासणीत विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे. पुढील वैज्ञानिक तपासणीसाठी मृत श्वानांपैकी दोघांच्या शरीरातील अवयवांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा वैद्यकीय अहवाल सुमारे १५ दिवसांत मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने मृत श्वानांची योग्य ती विल्हेवाट लावली.

चोरीच्या घटनांशी संबंध असल्याचा संशय

या परिसरात यापूर्वी महिलांच्या सोनसाखळ्या ओरबाडण्याच्या तसेच किरकोळ चोरीच्या घटना घडल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी श्वान भुंकत असल्याने चोरांच्या हालचालींना अडथळा निर्माण होत असावा आणि त्यातून हा विषप्रयोग झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या शक्यतेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मृत श्वानांना महापालिकेकडून रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि नसबंदी करण्यात आली होती. त्यांच्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेचा गांभीर्याने तपास करून दोषींना शोधावे आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आधार प्राणी रक्षक व सामाजिक संस्थेच्या संस्थापक दिव्या वरुटे यांनी केली आहे.

भटक्या प्राण्यांशी क्रूर वर्तन करणाऱ्यांवर कारवाई होणार का, तसेच या सामूहिक मृत्यूमागील नेमके कारण काय, याकडे आता धुळेकरांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.