ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील उपाध्यक्षपदी शामकांत पाटील, तर सचिवपदी अनोमदर्शी तायडे सर यांची निवड
ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील
उपाध्यक्षपदी शामकांत पाटील, तर सचिवपदी अनोमदर्शी तायडे सर यांची निवड
सावदा, प्रतिनिधी : ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशन, सावदा यांच्या अध्यक्षपदी पत्रकार प्रवीण पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी शामकांत पाटील, तर सचिवपदी अनोमदर्शी तायडे सर यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे सावदा परिसरातील पत्रकारिता क्षेत्रातून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
सावदा येथील विश्रामगृहावर शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता फाउंडेशनची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भात चर्चा करण्यात आली. मावळते अध्यक्ष शामकांत पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदाची जबाबदारी सोडण्याची भूमिका मांडली. त्याचबरोबर त्यांनी अध्यक्षपदासाठी प्रवीण पाटील यांच्या नावाची शिफारस केली. उपस्थित पत्रकारांनी या प्रस्तावाला एकमताने संमती दिली. त्यानंतर उपाध्यक्षपदी शामकांत पाटील आणि सचिवपदी अनोमदर्शी तायडे सर यांची निवड जाहीर करण्यात आली.
जनतेच्या प्रश्नांसाठी संघटित पत्रकारितेचा निर्धार
ताप्ती सातपुडा जर्नालिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न, सामाजिक समस्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी प्रभावीपणे मांडण्याचे काम केले जाते. जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठविणे, नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आणि पत्रकारांमध्ये एकजूट निर्माण करणे, ही संघटनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवडीनंतर नवनियुक्त अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सर्व पत्रकारांना सोबत घेऊन संघटनेचे काम पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. मावळते अध्यक्ष शामकांत पाटील यांनी सर्वांना विश्वासात घेऊन संघटनेचे काम केले. त्याच परंपरेनुसार पुढील काळातही एकजुटीने कार्य केले जाईल. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्यासोबतच संघटनेचा नावलौकिक वाढविण्यासाठी कटिबद्ध राहू, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार शामकांत पाटील, प्रवीण पाटील, राजेंद्र भारंबे, आत्माराम तायडे, पंकज पाटील, राजेंद्र दीपके, भरत हिवरे, जितेंद्र कुलकर्णी, साजिद शेख, राजेश चौधरी, संजय लोखंडे आदी पत्रकार उपस्थित होते.
नवनियुक्त अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष शामकांत पाटील आणि सचिव अनोमदर्शी तायडे सर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत