डॉ. लीना पाटील यांना ‘आयएमए प्रेसिडेंट्स अॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल; नागपूर येथे १३ नोव्हेंबरला होणार सन्मान सोहळा
डॉ. लीना पाटील यांना ‘आयएमए प्रेसिडेंट्स अॅप्रिसिएशन अवॉर्ड’ जाहीर
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाची दखल; नागपूर येथे १३ नोव्हेंबरला होणार सन्मान सोहळा
लेवाजगत न्यूज जळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), महाराष्ट्र राज्याच्या वतीने जळगाव शाखेच्या डॉ. लीना पाटील यांची ‘प्रेसिडेंट्स अॅप्रिसिएशन अवॉर्ड २०२५-२६’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान, वैद्यकीय सेवांप्रती असलेली बांधिलकी आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कार्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद सचिव डॉ. विक्रांत देसाई यांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे डॉ. लीना पाटील यांना पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती दिली. त्यांच्या या निवडीमुळे जळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पुरस्काराचे वितरण १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता नागपूर येथील उत्तर अंबाझरी रोडवरील आयएमए हाऊस येथे आयोजित ‘मास्टाकॉन २०२६’ परिषदेदरम्यान करण्यात येणार आहे. या सोहळ्यात आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. लीना पाटील यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांच्या योगदानाची दखल घेणे, त्यांच्या सेवाभावी वृत्तीला प्रोत्साहन देणे आणि संघटनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सदस्यांचा सन्मान करणे, हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे. डॉ. लीना पाटील यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड ही जळगाव आयएमए शाखेसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या पुरस्काराबद्दल माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. अनिल पाटील, डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. स्नेहल फेगडे, डॉ. विलास भोळे, डॉ. अनिता भोळे, डॉ. धनंजय बोरोले, डॉ. पंकज शहा तसेच टीम आयएमए आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ. लीना पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत