जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतुकीवर सक्त बंदी
जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतुकीवर सक्त बंदी
लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ५ : जळगाव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये Trigger-१ (प्रथम कळ) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने चारा वाहतूक व विक्रीवर निर्बंध लागू केले आहेत.
जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये अधिकारांचा वापर करून जळगाव जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक आणि विक्री करण्यास सक्त मनाई केली आहे.
या आदेशात हिरवा चारा, कडबा, विविध प्रकारची कुट्टी, पेंढा, टीएमआर तसेच इतर पशुखाद्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत मंजुरी मिळालेल्या चारा वाहतुकीला हा आदेश लागू राहणार नाही.
जिल्ह्यातील पशुधनासाठी भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये आणि पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश १ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत