जळगावात प्रेमसंबंधातून थरारक पाठलाग करत तरुणीवर गोळीबार; डाव्या पायाला लागली गोळी
जळगावात प्रेमसंबंधातून थरारक पाठलाग करत तरुणीवर गोळीबार; डाव्या पायाला लागली गोळी
वृत्तसंस्था जळगाव : दसऱ्याच्या मध्यरात्री जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून ३५ वर्षीय तरुणीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीचा आणि तिच्यासोबत असलेल्या मित्राचा दुचाकीवरून पाठलाग करून हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि गोळीबार केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पाठलाग करून केला गोळीबार
मिळालेल्या वृत्तानुसार, दसऱ्याच्या रात्री सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी हल्लेखोरांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला. जुन्या बसस्थानक परिसरात त्यांना गाठल्यानंतर अचानक गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तरुणीच्या डाव्या पायाला गोळी लागल्याने ती जखमी झाली.
जखमी तरुणीला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
चार वर्षांच्या प्रेमसंबंधाला कुटुंबाचा विरोध
प्राथमिक वृत्तानुसार, पीडित तरुणीचे पतीचे सुमारे १२ वर्षांपूर्वी निधन झाले असून, ती आपल्या दोन मुलांसह जळगावातील गोपाळपुरा परिसरात राहते. गेल्या चार वर्षांपासून तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येते.
मात्र, तरुणाच्या कुटुंबीयांना हे संबंध मान्य नव्हते. विशेषतः त्याच्या भावाचा या संबंधांना तीव्र विरोध असल्याने कुटुंबात वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. याच वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिसांकडून तपासाची अपेक्षा
या प्रकरणात अनिकेत मधुकर सपकाळे आणि त्याच्या साथीदारांची नावे समोर आली असून, घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. आरोपींचा शोध, गोळीबारासाठी वापरलेल्या शस्त्राचा तपास आणि घटनेमागील नेमके कारण याबाबत पोलिसांच्या अधिकृत तपासातून स्पष्टता येणार आहे.
दसऱ्याच्या रात्री शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत