जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरेचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश ९ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; सुवर्ण व कांस्यपदकांची कमाई
जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरेचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश
९ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; सुवर्ण व कांस्यपदकांची कमाई
प्रतिनिधी विजय पाटील | आवरे*,-
आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाचा नावलौकिक वाढविला असून, नऊ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या आयोजनातून १९ ऑक्टोबर रोजी रा. जि. प. शाळा, मोठी जुई येथे तालुकास्तरीय कराटे स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली.
स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकांसह कांस्यपदकांची कमाई केली. सुवर्णपदक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तनिष्का गावंड, भूमी म्हात्रे, वीरा गावंड, श्रीची वर्तक, अक्षरा वर्तक, सई म्हात्रे, तन्वी गावंड, मौर्य गावंड आणि शौर्य गावंड यांचा समावेश आहे. तर सान्वी गावंड, देवांग ठाकूर आणि निर्मित ठाकूर यांनी कांस्यपदक पटकाविले.
या यशामुळे विद्यार्थ्यांनी विद्यालयाचा क्रीडाक्षेत्रातील दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. अभ्यासासोबतच खेळालाही महत्त्व दिल्यास विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच आत्मविश्वास, शिस्त आणि एकाग्रतेचा विकास होतो. मेहनत आणि ध्येयाप्रती समर्पण यांची सांगड घातल्यास यश निश्चित मिळते, याचे उदाहरण या विद्यार्थ्यांनी आपल्या कामगिरीतून घालून दिले.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा व कराटे शिक्षक शुभम ठाकूर सर यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रतिक ठाकूर, विश्वस्त वामन ठाकूर, अलका ठाकूर, सिंधू ठाकूर, प्रसाद ठाकूर, आदिनाथ ठाकूर, रीना ठाकूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक जनार्दन ठाकूर सर यांना समर्पित केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी अशीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत