डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘गरबा नाईट २०२६’चा जल्लोष ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; दांडियाच्या माध्यमातून आदिशक्तीची आराधना
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘गरबा नाईट २०२६’चा जल्लोष
४०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; दांडियाच्या माध्यमातून आदिशक्तीची आराधना
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी परिषदेतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त ‘गरबा नाईट २०२६’ या दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या या उत्सवात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. या उपक्रमातून आदिशक्ती मातेची आराधना करत नवरात्रोत्सवाचा उत्साह अनुभवण्यात आला.
या कार्यक्रमाला गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील आणि स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आदिशक्ती मातेची आरती करून गरबा नाईटला सुरुवात करण्यात आली. या उत्सवात २०२१ ते २०२६ या शैक्षणिक वर्षांतील बॅचच्या ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डीजेच्या तालावर रंगलेल्या गरबा आणि दांडियामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर उत्साहाने भारावून गेला होता. पारंपरिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी नवरात्रोत्सवाचा आनंद साजरा केला.
या उत्सवादरम्यान विद्यार्थ्यांसाठी रील्स मेकिंग स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच कार्यक्रमात आणखी रंगत आली.
आयोजनासाठी यांचे सहकार्य
‘गरबा नाईट २०२६’ या दांडिया उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी जनरल सेक्रेटरी उत्कर्ष भोसले, मासूम पटले, प्राची मोराळे, पियूष चिंचकर, ऋत्वीक भुजबळ, मृणाल टिबे, चेतन माळी आणि वैभव लटपटे यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत