Contact Banner

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे येथे घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

 

janakibai-janardan-thakur-school-avare-sharada-utsav-ghatasthapana

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे येथे घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ




प्रतिनिधी | आवरे (शंकर पाटील)

आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूलमध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त घटस्थापना करून शारदा उत्सवाचा भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला. विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन, देवीची आरती आणि गरबा नृत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्सवाचा आनंद घेतला.

शारदीय नवरात्रोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्याचा संदेश देणारा उत्सव मानला जातो. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून आदिमाया आदिशक्ती दुर्गामातेची आराधना केली जाते. तसेच विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन हे अध्ययन प्रक्रियेतील महत्त्वाचे अंग मानले जाते.

यानिमित्त विद्यालयात सरस्वती मातेची मनोभावे पूजा-अर्चना करून घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर देवीची आरती घेण्यात आली. श्लोक, देवीचे स्तवन आणि आरती यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी व उपस्थितांनी तालासुरात आणि एकसुरात केले. त्यामुळे संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. जणू काही विद्येची देवता सरस्वती मातेचे विद्यालयात आगमन झाले आहे, अशी प्रसन्न अनुभूती उपस्थितांना आली.

आरतीनंतर विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गरबा नृत्याचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. अशोक ठाकूर सरांच्या श्रद्धेची परंपरा

आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांची आदिमाया आदिशक्ती दुर्गामातेवर अपार श्रद्धा होती. ते अनेक वर्षे स्वतःच्या खर्चाने आवरे गावातील भोलेनाथ मंदिरात एकविरा दुर्गामातेच्या नवरात्रोत्सवाचे आयोजन करीत असत. नऊ दिवस देवीचा जागर, सकाळ-संध्याकाळ आरती, विविध सांस्कृतिक आणि शालेय कार्यक्रमांच्या माध्यमातून ते भक्तिभावाने देवीची सेवा करीत असत.

त्यांच्या या श्रद्धेच्या परंपरेचे स्मरण करीत जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल, आवरे येथे शारदा उत्सवाला उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.