Contact Banner

केऱ्हाळे येथे दारूच्या नशेत झालेल्या वादातून तरुणाचा मृत्यू ग्राइंडर मशीनच्या कटरने गळ्यावर वार केल्याचा आरोप; पोलिसांकडून तपास सुरू

 

kerhale-raver-drunk-quarrel-youth-raju-kapde-death-grinder-cutter-attack

केऱ्हाळे येथे दारूच्या नशेत झालेल्या वादातून तरुणाचा मृत्यू

ग्राइंडर मशीनच्या कटरने गळ्यावर वार केल्याचा आरोप; पोलिसांकडून तपास सुरू

रावेर : लेवाजगत न्यूज प्रतिनिधी

रावेर तालुक्यातील केऱ्हाळे गावातील इंदिरानगर परिसरात दारूच्या नशेत झालेल्या वादाचे पर्यवसान प्राणघातक हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (६ ऑक्टोबर) दुपारी घडली. या घटनेत राजू कापडे (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामसिंग भील (वय ६२) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू कापडे हा रामसिंग भील याच्याकडे मिस्तरी काम करत होता. दोघेही केऱ्हाळे येथील इंदिरानगर परिसरात राहत असल्याचे सांगण्यात येते. राजू हा रामसिंगला जेवणाचा डबा आणून देत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

मंगळवारी दुपारी राजू रामसिंगच्या घरी गेला असता दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

वाद वाढल्यानंतर रामसिंगने मिस्तरी कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ग्राइंडर मशीनच्या कटरने राजूच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजू गंभीर जखमी झाला. त्याला रक्तस्त्राव झाल्याने तो घटनास्थळीच कोसळला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

या घटनेप्रकरणी रावेर पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, वादाचे नेमके कारण, हल्ल्याचा घटनाक्रम आणि या प्रकरणातील इतर बाबींचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे केऱ्हाळे गावातील इंदिरानगर परिसरात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.