पत्रांत जपलेली नाती आणि माडगूळकरांच्या साहित्याचा भावस्पर्श : ३३वे कविसंमेलन संपन्न
पत्रांत जपलेली नाती आणि माडगूळकरांच्या साहित्याचा भावस्पर्श : ३३वे कविसंमेलन संपन्न
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पत्रांच्या शब्दांत जपलेली नाती, आठवणी आणि सामाजिक जाणिवांना कवितेतून अभिव्यक्ती देणारे ३३वे कविसंमेलन रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व), मुंबई येथे उत्साहात संपन्न झाले. मराठी साहित्य व कला सेवा यांच्या वतीने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
संस्थेच्या अकराव्या वर्षातील या उपक्रमात कवींना स्वरचित कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमात मुक्त विषय, राष्ट्रीय टपाल दिनाच्या पूर्वस्मरणार्थ कविता आणि ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्याचे अभिवाचन अशी तीन नियोजित सत्रे झाली.
पहिल्या सत्रात जीवनानुभव, निसर्ग, मानवी नाती, सामाजिक वास्तव आणि अंतर्मनातील भावविश्व अशा विविध विषयांवरील स्वरचित कवितांचे सादरीकरण झाले.
दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय टपाल दिनाच्या पूर्वस्मरणार्थ पत्र, टपाल, पत्रलेखन, नाती, आठवणी, विरह, प्रतीक्षा आणि संवाद या विषयांवरील कविता सादर करण्यात आल्या. बदलत्या संवादमाध्यमांच्या काळात पत्रांशी जोडलेल्या आठवणी, आपुलकी आणि माणसांमधील भावबंध कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त झाले.
तिसऱ्या सत्रात ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्याचे अभिवाचन करण्यात आले. सहभागींच्या अभिवाचनातून माडगूळकरांच्या साहित्याला भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या सत्रामुळे काव्यसादरीकरणासोबतच मराठी साहित्यपरंपरेतील महत्त्वपूर्ण साहित्यिकाच्या लेखनाचा परिचय रसिकांना झाला.
उपलब्ध वेळेचा सदुपयोग व्हावा, यासाठी सर्वांच्या संमतीने चौथ्या सत्राचेही आयोजन करण्यात आले. या सत्रात सहभागी कवींनी आपल्या आवडीच्या स्वरचित कविता सादर केल्या. त्यामुळे कवींना आणखी एका रचनेचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.
अशोक कुलकर्णी, अशोक सहदेव सुकाळे, कृपा राकेश म्हात्रे, चंद्रकांत दढेकर, ज्योती राखुंडे, डॉ. मानसी पाटील, प्रणित थळे, प्रतिभा नवघरे, प्रिया प्रमोद दामले, बजरंग लक्ष्मण परब, बालकवयित्री अजया, विवेक वसंत जोशी, समिधा विकास नलावडे, सुनिता पांडुरंग अनभुले आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.
कवितांच्या आस्वादासाठी अजिता अजित मुळीक आणि अभिषेक अनभुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी केले. अल्पोपहाराची व्यवस्था कृपा राकेश म्हात्रे यांनी केली.
समारोपप्रसंगी संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी सहभागी कवी आणि आस्वादकांचे आभार मानले. कविता ही भावभावना, अनुभव, विचार आणि सामाजिक जाणिवांना अभिव्यक्त करणारे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रांशी जोडलेल्या आठवणींपासून ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्याच्या अभिवाचनापर्यंत विविध साहित्यिक विषयांना या कविसंमेलनात स्थान मिळाले.
दरम्यान, मराठी साहित्य व कला सेवा यांच्या वतीने पुढील ३४वे कविसंमेलन रविवार, १५ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत