खडसे फार्महाऊस परिसरात रात्री ड्रोनची घिरट्या; चौकशीची मागणी आमदार एकनाथराव खडसेंनी पोलिस प्रशासनाचे वेधले लक्ष; ड्रोन उडविणाऱ्याचा शोध घेऊन कारवाईची मागणी
खडसे फार्महाऊस परिसरात रात्री ड्रोनची घिरट्या; चौकशीची मागणी
आमदार एकनाथराव खडसेंनी पोलिस प्रशासनाचे वेधले लक्ष; ड्रोन उडविणाऱ्याचा शोध घेऊन कारवाईची मागणी
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर : नॅशनल हायवे क्रमांक ६ जवळील खडसे फार्महाऊस परिसरात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन आढळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. २८ सप्टेंबर रोजी रात्री संशयास्पद पद्धतीने ड्रोन उडवून परिसराची पाहणी तसेच चित्रीकरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार एकनाथराव खडसे यांनी पोलिस प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे.
फार्महाऊसच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या वॉचमनच्या निदर्शनास रात्रीच्या वेळी ड्रोन आल्याचे सांगण्यात आले. त्याने तत्काळ मोबाइलच्या माध्यमातून ड्रोनच्या हालचालींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यामुळे या घटनेच्या तपासात उपलब्ध व्हिडिओ महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असे खडसे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
रात्रीच्या वेळी परवानगीशिवाय खासगी परिसरात ड्रोन उडविण्यामागील नेमका उद्देश काय होता, ड्रोन कोण उडवत होते आणि त्यातून कोणत्या प्रकारचे चित्रीकरण करण्यात आले, याचा तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेत अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचीही पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात खडसे यांनी जळगावच्या पोलिस उपअधीक्षकांना पत्र दिले असून, ड्रोन उडविणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तपासातून समोर येणारी वस्तुनिष्ठ माहिती आपल्याला कळवावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, यापूर्वी आपल्या मोबाइल फोनच्या अनधिकृत टॅपिंगचा आरोप करून मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार केल्याचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या ड्रोन प्रकरणाचीही सखोल चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात चर्चेला उधाण आले असून, ड्रोन नेमका कोणी उडविला आणि त्यामागील उद्देश काय होता, हे पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत