नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशीची रावेरला मागणी
नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशीची रावेरला मागणी
रावेर, दि. ६ (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी निरागिका कोळी हिचा वसतिगृहात संशयास्पद मृत्यू झाल्याने या प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रावेरचे तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन दिले. विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील सत्य समोर आणण्यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली.
शिक्षण संस्थांमध्ये आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विशेष पोलीस यंत्रणा नियुक्त करावी, तसेच शिक्षण संस्थांमधील जातीय भेदभावाला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही समितीने केली आहे.
प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि मृत्यूमागील सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर संघर्ष समितीचे पदाधिकारी व समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या असून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रय तायडे, कार्याध्यक्ष दीपक तळले, उत्सव कमिटी अध्यक्ष विनोद कोळी, योगेश्वर कोळी, मनोहर कोळी, गणेश कोळी, भूषण तायडे, नितीन कोळी, अतुल कोळी, शामराव कोळी, विजय मानेकर, प्रवीण कोळी, प्रदीप रायमळे, किरण कोळी, विजय अवसरमल, विनोद तायडे, मयूर कोळी, सुपडू मोरे, विनोद कोळी, शुभम कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
#रावेर #नंदुरबार #निरागिकाकोळी #विद्यार्थिनी #संशयास्पदमृत्यू #CBIचौकशी #संघर्षसमिती #नवोदयविद्यालय #अक्कलकुवा #लेवाजगत


कोणत्याही टिप्पण्या नाहीत