Contact Banner

रावेर तालुक्यात शिवसेनेचा भव्य जनआक्रोश मोर्चा २३ ऑक्टोबरला शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन; शिवसेना युवा सेना व महिला आघाडीचा संयुक्त पुढाकार

 

raver-shiv-sena-jan-aakrosh-morcha-23-october-2026

रावेर तालुक्यात शिवसेनेचा भव्य जनआक्रोश मोर्चा २३ ऑक्टोबरला

शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन; शिवसेना युवा सेना व महिला आघाडीचा संयुक्त पुढाकार




रावेर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रावेर तालुका शिवसेना, युवा सेना व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १.३० वाजता छोरीया मार्केट येथून या मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेतृत्वाखाली आयोजित या मोर्चात माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा. श्री. अंबादासजी दानवे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून कळविण्यात आले आहे.

शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज

या मोर्चाद्वारे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे, तसेच अग्रिम पाच हजार रुपयांची मदत रद्द करून एकत्रित एक लाख रुपयांची मदत एकरकमी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात येणार आहेत.

याशिवाय बीपीएलधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत देण्यात यावी, लाडक्या बहिणींना सरसकट २१०० रुपयांची मदत मिळावी, शहरी व ग्रामीण भागातील घरपट्टी न करता सरसकट घरकुल लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांची मदत द्यावी, स्मार्ट मीटर बसवू नयेत, तसेच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीही या आंदोलनातून करण्यात येणार आहे.

नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

रावेर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

आयोजक : रावेर तालुका शिवसेना, युवा सेना व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.