Contact Banner

सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताचा पाया रचला : डॉ. रवींद्र भोळे उरुळी कांचन येथे राष्ट्रीय एकता रॅलीचे स्वागत; राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश

 

sardar-vallabhbhai-patel-national-unity-rally-uruli-kanchan-dr-ravindra-bhole

सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताचा पाया रचला : डॉ. रवींद्र भोळे

उरुळी कांचन येथे राष्ट्रीय एकता रॅलीचे स्वागत; राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश


sardar-vallabhbhai-patel-national-unity-rally-uruli-kanchan-dr-ravindra-bhole


लेवाजगत न्यूज उरुळी कांचन : स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील ५६५ हून अधिक लहान-मोठ्या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध भारताच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिले. जुनागड, हैदराबाद यांसारख्या संस्थानांच्या विलीनीकरणातील आव्हानांना सामोरे जात त्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल हे अखंड भारताचे शिल्पकार ठरतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार आणि दिव्यांग सेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी केले.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन येथे अखंड भारत राष्ट्रीय एकता रॅलीतील सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वागताचा आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. भोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुदुच्चेरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी असलेली अखंड भारत राष्ट्रीय एकता रॅली आयोजित करण्यात आली होती. ही रॅली उरुळी कांचन येथे दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने तिचे स्वागत करण्यात आले.

उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी रॅलीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या रॅलीचा प्रमुख उद्देश व्यसनमुक्तीचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणे, राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे, नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणे आणि देशाप्रती प्रेम व अभिमान निर्माण करणे हा होता. अशा उपक्रमांमुळे विविध राज्यांतील पोलीस दलांमध्ये समन्वय वाढण्याबरोबरच नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहोचण्यास मदत होते.

कार्यक्रमाला शिवाजीराव कांचन, दैनिक सकाळचे पत्रकार सुनील जगताप, बाळकृष्ण काकडे, संतोष कांचन, मयूर कांचन, सुनील तुपे, सुरेश वाडेकर, दैनिक केसरीचे पत्रकार अमोल भोसले, महा सुपरफास्ट न्यूजच्या संपादिका सुवर्णा कांचन, महाराष्ट्राची भूमीचे बाबुराव चौधरी, महंत गोपाळदास कपाटे, निखिल कांचन, पत्रकार शंकर झरड, किरण भंडारी आदी उपस्थित होते.

यावेळी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, स्वामी विवेकानंद विद्यामंदिरातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.