Contact Banner

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ७० वर्षांपुढे करण्याचा विचार व्हावा : न्यायमूर्ती अभय ओक

 

senior-citizen-age-limit-should-be-raised-beyond-70-justice-abhay-oak

ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ७० वर्षांपुढे करण्याचा विचार व्हावा : न्यायमूर्ती अभय ओक

senior-citizen-age-limit-should-be-raised-beyond-70-justice-abhay-oak


लेवाजगत न्यूज मुंबई : विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे मानवी आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा सध्याच्या ६० वर्षांऐवजी ७० वर्षांपुढे करण्याचा विचार व्हावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान सोहळा व आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी न्यायमूर्ती अभय ओक प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

निवृत्तीनंतर वयाच्या साठाव्या वर्षी मानसिकदृष्ट्याही आपण ज्येष्ठ झालो आणि सार्वजनिक जीवनातून निवृत्त झालो, अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी ठेवू नये. साठीनंतरची ‘तिसरी इनिंग’ राष्ट्रकार्य, समाजकार्य आणि सर्जनशील कार्यासाठी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव, ज्ञान आणि कौशल्ये समाजाच्या विकासासाठी तसेच पुढील पिढीच्या जडणघडणीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पर्यावरण बदलाचे गांभीर्य लक्षात घेता पर्यावरण संवर्धनासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरणीय समतोलासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही न्यायमूर्ती ओक यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी अध्यक्षीय समारोप करताना पिढ्यांमधील अंतर कमी करण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करावेत, तर तरुणांनी ज्येष्ठांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा आदर करावा. संवादातून पिढ्यांमधील अंतर कमी होऊन अधिक समावेशक समाजाची निर्मिती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे प्रकाश घादगिने (लातूर), बबन पाटणकर (ठाणे), भागीरथी बच्चेवार (नांदेड), वृषाली मगदूम (रायगड), मानव कांबळे (पुणे), जनसेवा फौंडेशन (पुणे) आणि ज्येष्ठ नागरिक संघ (चोपडा, जळगाव) यांना ‘यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उदय रामदास आणि मृण्मयी फाटक यांच्या ‘नादब्रह्म टीम’ने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्किन्सन्स आजाराबाबत मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आले. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिल वेंकटाचारी यांनी पार्किन्सन्सची लक्षणे, नियंत्रण, निरोगी जीवनशैली आणि दीर्घकाळ सक्रिय जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन केले.

विजय कान्हेकर यांनी प्रास्ताविकातून सेंटरच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ॲड. प्रमोद ढोकले यांनी निवड समितीच्या वतीने विचार मांडले. दीपिका शेरखाने यांनी आभार मानले, तर प्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनिषा खिल्लारे, वंदना वाळीकर, मीनल सावंत, प्रशांत इखर, अशोक जाधव आणि सुरज पवार यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.