श्री क्षेत्र लेण्याद्री येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी श्री गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती; महाप्रसाद, भजनसेवा आणि धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय
श्री क्षेत्र लेण्याद्री येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी
श्री गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती; महाप्रसाद, भजनसेवा आणि धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय
लेण्याद्री (जुन्नर) : सुनील ठाकूर
लेण्याद्री : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथे गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणपतीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच जुन्नर परिसरातील विविध गावांतून आलेल्या भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. दिवसभर धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद आणि भजनसेवेमुळे संपूर्ण लेण्याद्री परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणपतीच्या मूर्तीसह मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसराला विशेष धार्मिक आणि प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.
अभिषेक, महापूजा आणि महाआरती
श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी ६.१५ वाजता देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्री गिरिजात्मज गणपतीच्या मूर्तीस विधिवत अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता श्रींची महाआरती करण्यात आली. रात्री चंद्रोदयाच्या वेळीही श्रींची महाआरती करण्यात आली.
संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक विधी आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर देवस्थान प्रशासनाने विशेष भर दिला होता.
केळींचा नैवेद्य आणि खिचडी महाप्रसाद
संकष्टी चतुर्थीनिमित्त दौंड येथील विक्रम पांडुरंग दिवेकर यांनी श्रींच्या नैवेद्यासाठी दोन कॅरेट केळींचा प्रसाद अर्पण केला. तसेच वारकरी संप्रदायाचे वै. ह. भ. प. लक्ष्मण केरू भोसले यांच्या स्मरणार्थ वारकरी संप्रदायाच्या वतीने भाविकांसाठी खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी शिवेचीवाडी येथील श्री मुक्ताई प्रसादिक भजनी मंडळाच्या वतीने संगीतमय भजनसेवा सादर करण्यात आली. भक्तिमय वातावरणात झालेल्या या भजनसेवेचा भाविकांनी आनंद घेतला. रात्री महाआरतीनंतर जुन्नर येथील खालचा माळीवाडा परिसरातील जय गणेश ग्रुप आणि के. एम. ग्रुप यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
देवस्थान पदाधिकाऱ्यांसह भाविकांची उपस्थिती
या धार्मिक सोहळ्याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. संजय ढेकणे, उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त मच्छिंद्र शेटे, सदाशिव ताम्हाणे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहिदास बिडवई आणि व्यवस्थापक निलेश सरजिने यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने श्री क्षेत्र लेण्याद्री येथे भाविकांचा वाढता ओघ, विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि महाप्रसादाच्या माध्यमातून जपली जाणारी सेवाभावाची परंपरा यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. भाविकांना सुलभ दर्शन आणि आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवस्थान ट्रस्टने केलेल्या नियोजनामुळे संकष्टी चतुर्थीचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अॅड. संजय ढेकणे आणि सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत