शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रवास अखेरचा ठरला
उमाळा येथे वाहन उलटून अपघात; १६ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव : प्रतिनिधी-
शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रवास अखेरचा ठरला. उमाळा येथील माध्यमिक विद्यालयातून खासगी वाहनाने कंडारीकडे जात असताना वाहन उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अर्जुन ऊर्फ प्रदीप प्रल्हाद कोळी (वय १६, रा. कंडारी, ता. जळगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कंडारी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन हा उमाळा येथील माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शाळा सुटल्यानंतर तो इतर विद्यार्थ्यांसोबत खासगी वाहनाने घरी परतत असताना अचानक वाहन उलटले. या अपघातात अर्जुनसह नऊ विद्यार्थी जखमी झाले.
अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्जुनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारांसाठी गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
विद्यार्थ्याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अर्जुनच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीय आणि नातेवाइकांना मोठा धक्का बसला. शालेय वयातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कंडारी गावात शोककळा पसरली आहे. अपघातात जखमी झालेल्या अन्य विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबतही नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
नशिराबाद पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाहन नेमके कोणत्या कारणामुळे उलटले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
या दुर्घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांची खासगी वाहनांतून ने-आण करताना वाहनाची सुरक्षितता, प्रवाशांची निर्धारित क्षमता आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
— लेवाजगत न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत