Contact Banner

वरणगावात प्लास्टिकविरोधी मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

 

varangaon-plastic-ban-drive-25-kg-plastic-seized-35000-fine

वरणगावात प्लास्टिकविरोधी मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल


varangaon-plastic-ban-drive-25-kg-plastic-seized-35000-fine


लेवाजगत न्यूज वरणगाव : शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने वरणगाव नगरपरिषदेने सेवा संकल्प अभियानांतर्गत प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान तब्बल २५ किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल भोये यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता व नियंत्रण पथकाने शहरातील प्रमुख बाजारपेठा, आठवडे बाजार परिसर तसेच विविध दुकानांची अचानक तपासणी केली. या कारवाईत प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, ग्लास, वाट्या आणि अन्य प्लास्टिक साहित्याचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेत रशीद नौरंगाबादी, राहुल जाधव, संतोष गुजरे, दीपक काळे, राजू गायकवाड, संजय माळी आणि रविकांत नारखेडे यांनी सहभाग घेतला.

प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन

प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांनी प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. खरेदीसाठी कापडी पिशव्यांचा वापर करण्यावरही भर देण्यात आला आहे.

शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. नगरपरिषदेच्या या कारवाईचे पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून स्वागत होत असून, प्लास्टिकमुक्त वरणगावच्या उद्दिष्टपूर्तीसाठी व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.