Contact Banner

खाटू श्याम बाबांचे दर्शन ठरले अखेरचे; धुळ्यातील पवार कुटुंबावर काळाचा घाला, ९ जणांचा मृत्यू राजस्थानातील कोटा परिसरात भीषण अपघात; सहा जण जखमी, धुळे जिल्ह्यात शोककळा

 

dhule-pawar-family-9-dead-kota-rajasthan-road-accident

खाटू श्याम बाबांचे दर्शन ठरले अखेरचे; धुळ्यातील पवार कुटुंबावर काळाचा घाला, ९ जणांचा मृत्यू

राजस्थानातील कोटा परिसरात भीषण अपघात; सहा जण जखमी, धुळे जिल्ह्यात शोककळा

धुळे : राजस्थानमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र खाटू श्याम बाबांचे दर्शन घेऊन आनंदाने परतणाऱ्या धुळे जिल्ह्यातील भाविकांवर काळाने घाला घातला. राजस्थानातील कोटा परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात पवार कुटुंबातील नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेने धुळे शहरासह शिंदखेडा तालुका आणि शहादा परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहर व जिल्ह्यातील पवार कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक तीन वाहनांमधून राजस्थान येथील खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून सर्वजण आपल्या गावी परतत असताना कोटा परिसरात त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, संबंधित वाहनातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने कोटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.

मृतांमध्ये धुळे, शिंदखेडा आणि शहाद्यातील भाविकांचा समावेश

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये धुळे शहरातील सज्जन पवार, उषा पवार, माधवी पवार आणि सांगवी पवार यांचा समावेश आहे. तसेच शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील कैलास पवार, अनिता पवार आणि जान्हवी पवार, तर शहादा येथील सुशीला पवार आणि बाबुलाल पवार यांचा मृत्यू झाला आहे.

एकाच कुटुंबातील आणि नातेसंबंधातील नऊ जणांचा एकाच दुर्घटनेत मृत्यू झाल्याने पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी निघालेला प्रवास अखेरचा ठरेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. या हृदयद्रावक घटनेमुळे धुळे जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.