रॅगिंग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
रॅगिंग करणे कायद्याने गंभीर गुन्हा – डॉ. सोळंके
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधासाठी संयुक्त सभेचे आयोजन; विद्यार्थ्यांनी घेतली रॅगिंगविरोधी प्रतिज्ञा
लेवाजगत न्युज जळगाव : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा छळ रोखण्यासाठी रॅगिंग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला असून, रॅगिंग करणे हा कायद्याच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. महाविद्यालयात कोणत्याही परिस्थितीत रॅगिंग खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी दिला.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी रॅगिंग प्रतिबंधात्मक संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, डॉ. माया आर्विकर, डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. सी. डी. सारंग, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, कांचन रोटे तसेच विद्यार्थी स्वराज सूर्या, सिद्दिका मुस्कान यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी प्रा. डॉ. बापुराव बिटे यांनी रॅगिंग म्हणजे काय, रॅगिंगचे विविध प्रकार आणि त्याचे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक जीवनावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी आदराची आणि स्नेहाची भावना ठेवावी, असे आवाहन केले. रॅगिंग हा केवळ छळाचा प्रकार नसून विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकणारा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने रॅगिंगपासून दूर राहून महाविद्यालयाचे शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरण टिकविण्यास सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
रजिस्ट्रार प्रमोद भिरूड यांनीही रॅगिंग प्रतिबंधात्मक कायद्याची माहिती देत महाविद्यालयाचा परिसर हा रॅगिंगमुक्त परिसर असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी निर्भयपणे शिक्षण घ्यावे तसेच रॅगिंगसारख्या प्रकारांना प्रोत्साहन न देता अशा घटनांविरोधात जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी रॅगिंग प्रतिबंधात्मक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाला एमबीबीएस अभ्यासक्रमाचे प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील लिपिक व इतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत