जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कूलच्या मुलींचे सुवर्णयश! १७ वर्षांखालील मुलींच्या संघाचा प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड
जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील स्कूलच्या मुलींचे सुवर्णयश!
१७ वर्षांखालील मुलींच्या संघाचा प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड
भुसावळ (प्रतिनिधी) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील १७ वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल संघाने जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा २०२६ मध्ये शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयासह संघाने जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले असून, विभागीय स्तरावरील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेसाठीही आपली निवड निश्चित केली आहे.
जामनेर येथे १ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलींनी उत्कृष्ट सांघिक समन्वय, चपळता, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत विजेतेपद मिळविले. खेळाडूंनी मैदानावर दाखविलेली शिस्त, आक्रमक खेळशैली आणि विजयासाठीची चिकाटी विशेष कौतुकास्पद ठरली.
या दैदीप्यमान यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता विभागीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या संघाला मिळणार असून, आगामी स्पर्धेतही अशीच चमकदार कामगिरी करण्याचा विश्वास खेळाडूंनी व्यक्त केला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि शिक्षकवृंद यांच्या योगदानाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्याच्या शाळेच्या प्रयत्नांना या यशामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत