वाराणसीत फैजपूरच्या ‘तुलसी हेल्थ केअर सेंटर’चा भव्य सन्मान! संस्कृती संसदेत ‘उत्तम प्राकृतिक आरोग्य निधी’ पुरस्काराने गौरव; संत-महंतांच्या उपस्थितीत संस्थेच्या कार्याचा गौरव
वाराणसीत फैजपूरच्या ‘तुलसी हेल्थ केअर सेंटर’चा भव्य सन्मान!
संस्कृती संसदेत ‘उत्तम प्राकृतिक आरोग्य निधी’ पुरस्काराने गौरव; संत-महंतांच्या उपस्थितीत संस्थेच्या कार्याचा गौरव
फैजपूर (प्रतिनिधी) : भारतीय ऋषीमुनींनी दिलेल्या नैसर्गिक उपचार परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कार्यरत असलेल्या फैजपूर येथील ‘तुलसी हेल्थ केअर सेंटर’ या संस्थेचा वाराणसी (काशी) येथे आयोजित तीन दिवसीय संस्कृती संसदेत भव्य सन्मान करण्यात आला. संस्थेला प्रतिष्ठेचा ‘उत्तम प्राकृतिक आरोग्य निधी’ पुरस्कार प्रदान करून तिच्या आरोग्यविषयक सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे फैजपूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार, सत्पंथरत्न ज्येष्ठ महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांनी स्थापन केलेल्या या संस्थेला ‘सुख शांती समृद्धी पत्रिका’, ‘विश्व विद्यापीठ महानुभाव समिती’ आणि ‘विश्व समाज रत्न महासंघ’ यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संत जनार्दन हरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तुलसी हेल्थ केअर सेंटर गेल्या काही काळापासून भारतीय ऋषीमुनींनी विकसित केलेल्या नैसर्गिक उपचार पद्धतींचे जतन व पुनरुज्जीवन करण्यासाठी कार्यरत आहे. शरीराचे आरोग्य, शुद्धीकरण आणि नैसर्गिक जीवनशैली यांना प्राधान्य देणाऱ्या संस्थेच्या कार्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. नैसर्गिक उपचार पद्धतींबाबत जनजागृती करून सर्वसामान्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेमार्फत केले जात आहे.
वाराणसी येथे आयोजित संस्कृती संसदेच्या भव्य व्यासपीठावर देशभरातील नामवंत संत-महंत, महामंडलेश्वर, शंकराचार्य, विविध आखाड्यांचे प्रतिनिधी, धर्माचार्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी वैष्णवसम्राट मोहनदासजी महाराज, महामंडलेश्वर राधे राधे बाबा मनमोहनदासजी महाराज (इंदूर), संत समितीचे सह-सरचिटणीस डॉ. काशी सुमेरू, पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वतीजी महाराज, निर्वाण पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी विशोकानंदजी महाराज, जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी रामकमलाचार्य वेदांतीजी महाराज, पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंद आचार्यजी, जगद्गुरू श्री नरसिंह देवाचार्यजी महाराज, ब्रह्मचारी गिरीश महर्षी, आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरीजी, अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष अविचल देवाचार्यजी महाराज, सरचिटणीस जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांच्यासह देशभरातील अनेक संत-महंत उपस्थित होते.
तसेच विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख सदस्य चम्पत राय, अशोकजी, दिनेशजी, आलोकजी, अशोक तिवारीजी, ज्येष्ठ पत्रकार जितू सोमपुरा, विविध आखाड्यांचे पदाधिकारी, काशी विद्वत परिषदेचे प्रतिनिधी आणि युवा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या तीन दिवसीय संस्कृती संसदेत भारतीय संस्कृती, राष्ट्रहित, धार्मिक परंपरा आणि सामाजिक विषयांवर चिंतन व विचारमंथन करण्यात आले. याच व्यासपीठावर तुलसी हेल्थ केअर सेंटरच्या कार्याची दखल घेत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पत्रकारांशी संवाद साधताना यापूर्वी तुलसी आरोग्य केंद्रातील उपचारांचा लाभ घेतलेल्या विविध महामंडलेश्वर आणि संतांनी संस्थेच्या सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक केले. नैसर्गिक उपचार पद्धतींबाबत जनजागृती होणे आवश्यक असून नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य मार्गदर्शन घेऊन अशा उपचार पद्धतींची माहिती करून घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
फैजपूरसारख्या शहरातून राष्ट्रीय स्तरावर आरोग्यसेवेचा ठसा उमटविणाऱ्या तुलसी हेल्थ केअर सेंटरला मिळालेला हा सन्मान संस्थेच्या कार्याची दखल घेणारा असून फैजपूरच्या सामाजिक व आरोग्य क्षेत्रासाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब ठरली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत