आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी साडेबारा कोटींच्या पाणी योजनांना मंजुरी; ७० गावांना मिळणार सौरऊर्जेचा प्रकाश!
आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी साडेबारा कोटींच्या पाणी योजनांना मंजुरी; ७० गावांना मिळणार सौरऊर्जेचा प्रकाश!
जनजातीय गौरव सेवा सप्ताहातून आदिवासी विकासाला नवी दिशा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा
जळगाव : प्रतिनिधी
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आदिवासी पाड्यांवरील उर्वरित पाणीपुरवठा योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साडेबारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील सुमारे ७० दुर्गम गावे व पाड्यांना सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष हा आदिवासी समाजाच्या हक्कांचा, स्वाभिमानाचा आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रेरणादायी इतिहास आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविणे हाच त्यांच्या कार्याचा खरा सन्मान आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबाला मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.
७० दुर्गम गावांना सौरऊर्जेचा आधार
आदिवासी भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य देताना पाणीपुरवठा आणि वीज या प्रश्नांवर विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आदिवासी पाडे व वस्त्यांवरील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांसाठी साडेबारा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय रावेर, यावल आणि चोपडा तालुक्यांतील अतिदुर्गम भागातील जवळपास ७० गावे व पाड्यांमध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
आदिवासी भागातील आरोग्य आणि पोषणावर भर
वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढविण्याची गरज व्यक्त केली. आदिवासी भागात सिकलसेल अॅनिमियाची तपासणी आणि जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दुर्गम भागातील विकासकामांची माहिती देताना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागातील कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. तसेच वीजपुरवठा नसलेल्या पाड्यांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प, पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी आणि रस्ते विकासासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, शासकीय वसतिगृहे व आश्रमशाळांमध्ये अद्ययावत अभ्यासिका, डिजिटल बोर्ड, सीसीटीव्ही, इन्व्हर्टर आणि सौरऊर्जा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सात शासकीय वसतिगृहे आणि नऊ आश्रमशाळांमध्ये अभ्यासिका व गरम पाण्यासाठी हीट पंप बसविण्यात आले आहेत. १७ वसतिगृहे आणि १७ आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही व इन्व्हर्टर सुविधा देण्यात आल्या आहेत. सहा वसतिगृहे आणि सात आश्रमशाळांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यात आले आहे. १७ आश्रमशाळांमध्ये डिजिटल बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले असून, ११ आश्रमशाळांच्या नवीन इमारतींची कामे प्रगतिपथावर आहेत.
विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानाने इस्रोच्या बंगळुरू किंवा अहमदाबाद येथील केंद्राला शैक्षणिक भेट देण्याची संधी दिली जाते. तसेच सुंदर शाळा अभियानात जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या आश्रमशाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येते.
आठ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन
जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत ११ व १२ नोव्हेंबरला पत्रकार परिषदांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. १३ नोव्हेंबरला लाभार्थ्यांना योजनांचे लाभवाटप, महिला बचत गट व स्वयंरोजगार मार्गदर्शन होईल. १४ नोव्हेंबरला आदिवासी महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता, दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील.
१५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबरला आधारकार्ड व विविध शासकीय कागदपत्रांसाठी विशेष शिबिरे, १७ नोव्हेंबरला आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती, तर १८ नोव्हेंबरला रोजगार, कौशल्यविकास, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार आणि आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी सप्ताहाच्या नियोजनाची माहिती देताना सर्व विभागांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले.
आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचा या सेवा सप्ताहाचा उद्देश आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचल्यास भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत